बसवंत विठाबाई बाबाराव
रोजच्या वेळी काव्याची गाडी फाटकापाशी आली.
“काव्या, चला उतरा… घर आलं!” व्हॅन-काकांनी काव्याला उतरायला सांगितलं.
“आज आमच्यावर नाराज दिसते एक मुलगी… गाडीत काहीच बोलली नाही. अशी शांत बसलेली काव्या असली, की आम्हाला शाळेत गेल्यासारखंच वाटत नाही.”
काव्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. नेहमी शाळेतून येताना काकांसोबत मस्ती करते, हटूमुटूचं भांडण करते… मग दोघं एकमेकांचा हसत निरोप घेतात. ‘उद्या वेळेत ये’ असं सांगून काका पुढे जातात. आज मात्र असं काहीच घडलं नाही. ‘असं का?’ हे कोडं जसं व्हॅन-काकांना होतं तसंच मलाही. मी लगेच कारण विचारलं नाही.
आम्ही घरात आलो. काव्याचा आवडता पदार्थ म्हणजे ब्रेड पकोडा. आज मी तोच करणार होते.
“काव्या तुला माहिती आहे का आज तुझ्यासाठी काय खाऊ केला आहे? ओळख पाहू?” तिला तिचा गणवेश काढायला मदत करत मी म्हणाले.
त्यावर तिचा शून्य प्रतिसाद. तिला हातपाय धुवायला सांगून मी स्वयंपाकघरात गेले. डब्याची पिशवी काढून पाहते तर काय, निम्म्याहून अधिक डबा तसाच.
“आजची भाजी आवडलेली दिसत नाही! डबा तसाच परत आलाय. असू दे. मी छान तुझ्या आवडीचा ब्रेड पकोडा करते.”
आता कुठे तिच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद झळकला. मला थोडं हायसं वाटलं. मात्र ते अगदीच क्षणिक होतं. ती कुठेतरी खोलवर दुखावली गेली होती का? मनातली चुणचुण काही जाईना. मनाला थोडा आवर घालत मी तिला थोडा वेळ द्यायचं ठरवलं.
“ब्रेड पकोडा छान कुरकुरीत झालाय. आज तुला बाबांसारखे करायला जमलेत हं!” माझं कौतुक करत काव्याने ब्रेड पकोडे खाल्ले.
काव्याचा लहान भाऊ सारंग. झोप झाली तसा तोही उठून आला आणि त्यानं खायला घेतलं.
“अरे तोंड तरी धू आधी.” काव्या त्याला म्हणाली.
“सकाळीच तर धुतलं. हो ना ग आई?” सारंगनं खायला सुरूच केलं. आता वातावरण बऱ्यापैकी हलकंफुलकं झालं होतं; पण ‘शाळेतून नाराज होऊन का आली’, हा विषय काढण्याचं मला धाडस झालं नाही. तिचे बाबा घरी येईपर्यंत वाट पाहू म्हणत मी स्वयंपाकघरात आवराआवरी करायला लागले.
काव्या आणि सारंग बाहेर खेळत होते. मीही माझ्या कामात गुंतले. साडेपाचचे साडेसहा, सात झाले… तितक्यात काव्याने फोडलेला हंबरडा ऐकायला आला. लगबगीनं मी बाहेर आले. पाहते तो सतीश (काव्याचा बाबा) आलेला.
काव्या त्याच्या गळ्यात पडून हुंदके देत बोलत होती, “मी आता शाळेत जाणार नाही.”
“ठीक आहे. नको जाऊस.” तिला समजावण्याच्या सुरात सतीश म्हणाला. तिच्या पाठीवरून हात फिरवत तो तिला घरात घेऊन आला.
बाबाबरोबर काव्याची भावनिक जवळीक आहे. तो समोर दिसला, की तिला अगदी छोट्या छोट्या गोष्टींचंही दुःख अनावर होतं. अगदी शाळेत, व्हॅनमध्ये कुणी काही बोललं असलं तरीही… पण ‘मी शाळेत जाणार नाही’ असं ती आजवर कधीच बोलली नव्हती.
“काव्या! बाबांना हातपाय धुवू दे. दमून आलेत न ते?” मी काव्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र काव्या आणि तिचा बाबा, दोघंही एकमेकांना सोडण्याच्या ‘मूड’मध्ये नव्हते. हळूहळू काव्याचे हुंदके कमी झाले.
“काय झालं? कोणी काही बोललं का?” सतीशनं अंदाज घ्यायचा प्रयत्न केला.
“मी शाळेत जाणार नाही बाबा. सर्वजण मला मुलगा मुलगा म्हणून चिडवतात. आणि आज ताईंनीपण मला ‘मुलांच्या ओळीत बस, तू मुलगा आहेस न?’ म्हटलं. सगळी मुलं मला हसत होती.”
“अरे! ताई असं का म्हणाल्या? त्या तर तुला रोजच पाहतात!”, सतीश म्हणाला.
काव्या परत हुंदके देत म्हणाली, “नाही बाबा. या ताई वर्गावर रोज येत नाहीत.”
आता सगळी परिस्थिती माझ्या लक्षात आली.
“मी उद्या तुझ्याबरोबर शाळेत येऊन ताईंशी बोलेन. तसं त्यांचं चुकलंच म्हणा. असं म्हणायला नको.”
सतीशने आता काव्याला बरंच शांत केलं होतं. विषयांतर करायचं म्हणून मीच म्हटलं, “आज मी काव्याच्या आवडीचे ब्रेड पकोडे केले आहेत. आणि ते ‘बाबा करतो तसे झालेत’ असं कौतुकही झालं आहे बरं!”
“अरे वा! छान. चल काव्या आपण ब्रेड पकोडे खाऊया!” काव्याला अलगद बाजूला करत फ्रेश होण्यासाठी सतीश बाथरूममध्ये गेला. त्या संध्याकाळी मग आम्ही सर्वांनी एकत्र ब्रेडपकोड्यांचा आस्वाद घेतला.
नंतर सतीशने दोघांना गोष्टी सांगायला सुरुवात केली. ऐकता ऐकता दोघंही झोपी गेली. त्यांच्याकडे पाहून समाधान वाटत होतं; पण मला काही झोप येत नव्हती.
मी सतीशला म्हणाले, “वाढवूयात का रे आपण तिचे केस? तिच्या सर्व मैत्रिणींचे केस मोठे आहेत. ती म्हणत नसली, तरी तिलाही केस वाढवायची इच्छा आहे असं वाटतं.”
“हे बघ, केस वाढवायला माझा अजिबात विरोध नाही; पण ‘मुलगी म्हणजे मोठे केस’ हा समज वाढण्याला माझा विरोध आहे. आणि केस वाढवले, तर दररोज सकाळी आवरण्यासाठीच्या वेळेत किमान पंधरा मिनिटं वाढतील. पुन्हा वेळोवेळी केसांची स्वच्छताही आली. आत्ता ती तयार आहे न केस कमी ठेवायला? पुढे मोठी झाल्यावर तिचा तिला निर्णय घेऊ दे.”
सतीशचं म्हणणं पटण्यासारखंच होतं; मात्र काव्या अशी रोज रोज नाराज होऊन घरी येत असेल तर तेही चालणार नव्हतं.
“ठीक आहे. असू देत कमी केस. मात्र तू तिच्याशी एकदा नीट बोल. आणि तिच्या ताईंशीही एकदा शाळेत जाऊन बोलायला हवं. परत तिच्याशी असं बोललं जायला नको.” मी त्याला म्हणाले.
आता सतीश थोडा पालकत्वाच्या जबाबदारीच्या भूमिकेत आला.
“हे बघ, काव्याशी संवाद साधणं आणि ताईंशी बोलून झाला प्रकार समजून घेणं, त्यावर तोडगा काढणं ह्या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. पैकी काव्याशी संवाद साधण्याचं काम मी चांगलं करू शकतो. तू उद्या शाळेत जाऊन ताईंशी बोलू शकशील का?
ताईंशी काय आणि कसं बोलायचं याचा विचार करता करता माझा डोळा लागला.
सकाळी डोळे उघडले तेव्हा आवराआवर करून सतीश आणि काव्या ‘मॉर्निंग वॉक’ला निघाले होते. मीही उठून आवरायला घेतलं. मॉर्निंग वॉक ही सतीशला काव्याशी स्वतंत्र आणि मोकळा संवाद साधण्याची जागा वाटते. एक तर सारंग अजून उठलेला नसतो आणि मीही आजूबाजूला नसते. काव्या बाबांशी तिच्या मनात असेल ते सर्व मोकळेपणानं बोलते.
चालता चालता अर्धा-पाऊण तास दोघांच्या मस्त गप्पा झाल्या. कालचा प्रसंग विसरून काव्या आता उत्साहात दिसत होती. सतीश ऑफिसला आणि काव्या शाळेत गेली. मीनाक्षीताई ह्या काव्याच्या वर्गताई. शाळेत फोन करून मी त्यांची वेळ घेतली. दुपारून त्यांनी भेटायला बोलावलं.
शाळेत गेले तेव्हा काही वर्गांची मुलं मैदानात खेळत होती. मी शाळेत पोचल्याचं मीनाक्षीताईंना कळवलं. त्यांनी मला कार्यालयाशेजारच्या खोलीत बसायला सांगितलं. तिथे भिंतींवर मुलांनी त्यांच्या सहलीचे लिहिलेले निवडक अनुभव लावलेले होते, ते वाचत बसले. चौथी-पाचवीच्या मुलांचं इतकं जिवंत अनुभव-लेखन मनाला सुखावणारं होतं. शाळा किती चांगल्या पद्धतीनं काम करते याचं समाधान वाटलंच; शिवाय आपण आपल्या मुलांसाठी चांगली शाळा निवडल्याचंही समाधान वाटलं.
मीनाक्षीताई खोलीत आल्या. मी कालचा सगळा प्रकार त्यांना सांगितला. माझं सर्व त्यांनी नीट ऐकून घेतलं. ‘त्या ताई नवीन असल्यामुळे त्यांच्याकडून असं म्हटलं गेलं’ हाच त्यांच्या स्पष्टीकरणाचा मुख्य मुद्दा होता. अर्थात, माझं काही त्यामुळे समाधान झालं नाही. शेवटी निघत असताना त्यांनी एक सल्ला दिला. ते ऐकून तर मी थक्क झाले.
“तुम्ही काव्याचे केस का वाढवत नाही? केस कमी असल्यामुळे मुलांचा, ताईंचा गैरसमज होतो. त्यामुळे तुम्ही तिचे केस वाढवण्याचा विचार करा.”
मी त्यांच्याशी अधिक काही बोलायचं टाळलं.
माझंच जिथे ताईंच्या सल्ल्यानं समाधान झालं नाही, तिथे सतीशला हे पटणं अजिबातच शक्य नव्हतं.
घडलेला प्रकार सतीशला सांगण्यासाठी मोबाईल काढला, तर त्याचेच दोन ‘मिस्ड कॉल’ होते. त्यानं मेसेजही करून ठेवला होता, ‘संध्याकाळी सहा वाजता ‘संवाद’ संस्थेतर्फे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये एक गाण्यांचा कार्यक्रम आहे, त्याचे पास घेतलेले आहेत. मुलांना घेऊन तिकडेच ये’.
संध्याकाळी आम्ही तिघं पोचेपर्यंत बरेचजण जमले होते. त्यातल्या कुणाशीही माझा परिचय नव्हता.
काव्याचे प्रश्न सुरू झाले. “आई त्या माणसाला दाढी-मिशा आहेत, मग त्यानं साडी का नेसली आहे?”
दुसऱ्या एकाकडे बघून, “हा मुलगा आहे न? याचे केस का मोठे आहेत?”
याबाबत सतीश नेहमी जे सांगायचा त्याचाच आधार घेऊन मी माझ्या परीनं उत्तर दिलं आणि बाबा आल्यावर त्यांना विचारण्यास सांगितलं.
तेवढ्यात सतीश पोचला. कार्यक्रम सुरू व्हायला थोडाच वेळ होता. आम्ही सर्वजण हॉलच्या दिशेनं निघालो. बाबा भेटताच काव्याचे प्रश्न सुरू झाले. सतीश त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं उत्तरं देत होता. “केस कमी-जास्त असणं किंवा कपडे ह्यांचा मुलगा मुलगी असण्याशी तसा संबंध नाही… लोक त्यांना जे कपडे वापरायला आवडतात, सोयीचे वाटतात ते कपडे घालतात, तसे केस ठेवतात… हेच तर मी सकाळी तुला सांगत होतो… आता प्रत्यक्ष बघितलं ना?”
सकाळच्या त्यांच्या संवादाला आधार मिळाल्याचं समाधान सतीशच्या चेहऱ्यावर उमटलं.
आम्हाला सर्वांना कार्यक्रम आवडला; अगदी सारंगही गाण्यांचा छान आस्वाद घेत होता. निघेनिघेपर्यंत मात्र दोघंही झोपेला आली. परतीच्या प्रवासात मी शाळेत ताईंशी झालेलं बोलणं सतीशला सांगितलं. तोही प्रचंड अस्वस्थ झाला. शांतच बसला.
थोड्या वेळानं मौन सोडत म्हणाला, “माझ्यासाठी तू एक गोष्ट करशील का?”
मला काही अंदाज येत नव्हता. “काय करायचं आहे सांग तर. आपल्या सर्वांच्या हिताचं असेल तर करेन की.”
“उद्या आपण दोघं टक्कल करूयात. सगळे केस काढायचे.”
“आणि मुलं?”
“ती म्हणाली तर त्यांचेही.”
मीनाक्षीताईंची भूमिका म्हणजे शाळेची भूमिका नसेलही; पण आम्ही सर्वांनी केस काढून त्यांच्या त्या विचाराला उत्तर देणं हे मलाही पटलं. आम्हाला काही सिद्ध करायचं नव्हतं; फक्त काव्यासोबत उभं राहायचं होतं. मग काय दुसऱ्याच दिवशी चौघांनी एकत्रच न्हाव्याचं दुकान गाठलं. तिथे दुकानातही केस मोठे असणं, छोटे असणं या विषयी काव्याशी बोलणं सुरू होतंच…
(टीप : ही कथा काल्पनिक आहे. मात्र कथेत मांडलेले प्रश्न आणि अनुभव आपल्या समाजात अनेक मुलांना वेगवेगळ्या स्वरूपात येत असतात. बाह्यरूप, कपडे किंवा केसांच्या आधारे मुलांच्या ओळखीबद्दल ठोकताळे मांडण्याऐवजी त्यांना स्वतःसारखे राहण्याची मोकळीक देणे अधिक महत्त्वाचे आहे.)
बसवंत विठाबाई बाबाराव

