शाळेची माध्यम-भाषा एकच नको!
उन्नती संस्था ‘बहुभाषी शिक्षण’ या विषयात काम करते. आपल्या बहुभाषक समाजात शाळेची माध्यमभाषा मात्र कोणतीतरी एकच असणे हे कृत्रिम, अन्याय्य आणि मुलांच्या शिक्षणप्रक्रियेस मारक आहे. प्राथमिकच्या टप्प्यावरतरी शाळेचे भाषा-माध्यम बहुभाषाच असायला हवे, हे आपल्या 7-8 वर्षांच्या अनुभवातून संस्था सांगते. तसे करणे शक्यही आहे. माध्यमिकमध्ये काम करण्याचा अनुभव नसल्याने त्याबाबत त्यांनी ठामपणे काही विधान केले नसले, तरी तिकडेही मुलांच्या भाषांचा वापर उपयोगी ठरेल, असे त्यांना वाटते.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील खिरकुंड हे आदिवासी गाव. उंच टेकडीवर वसलेले; जंगलाशी अजूनही थोडी नाळ जोडून असलेले. सगळे गावच कोरकू भाषा बोलणारे.
या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. 26 जानेवारी आठवड्यावर येऊन ठेपली होती. शाळेत या काळात एकच धूम असते. शाळेतून नवीन कपडे मिळण्याची मुले आतुरतेने वाट बघत असतात. वर्गात मी सहज मुलांना विचारले, ‘‘नवीन कपडे मिळणार न तुम्हाला?’’ मुले काहीच बोलली नाहीत. मी म्हटले, ‘‘गुरुजींना विचारा कधीपर्यंत मिळतील कपडे.’’ त्यावर अस्मिता उत्तरली, ‘‘सर मराठीत बोलतात. आम्हाला मराठी बोलता येत नाही.’’ आमचा हा सर्व वार्तालाप कोरकूमधून झाला. माझ्या वर्गात इयत्ता पहिली ते तिसरीची मुले आहेत.
दोन वर्षांपूर्वी काही गावांमध्ये आम्ही दहावीत नापास झालेल्या मुलांसाठी गणित आणि विज्ञानाचे वर्ग घेत होतो. मुले वर्गात फार कमी बोलायची. शंकासुद्धा विचारायची नाहीत. अशाने त्यांचे शिक्षण कसे होणार हा आम्हाला प्रश्न पडायचा. एकदा आमचा कोरकू-भाषक कार्यकर्ता वर्गावर गेला. त्याने कोरकू भाषेतून मुलांना काही प्रश्न विचारले आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला. यानंतर त्यांनी कोरकू भाषेत त्यांच्या गणितविषयक बर्याच शंका विचारल्या. आम्ही अचंबित झालो. मग या वर्गातील संवाद कोरकूतूनच होईल हे आम्ही पाहू लागलो.
आमच्या चिचपाणी गावातील वर्गात एकदा पुण्यातील आमची एक सहकारी आली होती. वर्ग झाल्यावर ती म्हणाली, ‘‘ही मुले केवढी बोलतात ग! आदिवासी आहेत असे वाटतच नाही. मी ज्या ज्या म्हणून आदिवासी भागातील शाळा फिरले त्यात मुले अगदी काहीच बोलत नाहीत. शांत असतात.’’ तिचे हे विधान म्हणजे आम्ही ज्या विचाराचा प्रसार करतो त्याच्या यशस्वी आविष्काराची एक प्रकारे पावतीच होती.
सुभाष केदार, हेमांगी जोशी | www.unnati-isec.org | education@unnati-isec.org