बाबा चूक करतो तेव्हा…

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय    |   अलेक्झांडर रास्किन

लहान असताना बाबा दूध, पाणी, चहा घ्यायचा आणि त्याला कॉडलिव्हर ऑईलही दिलं जायचं. वाढत्या वयातल्या मुलांसाठी कॉडलिव्हर ऑईल चांगलं असतं, असं त्या काळी मानलं जात असे. पण ते भयंकर असायचं. छोट्या बाबाला वाटायचं, की या जगात कॉडलिव्हर ऑईलएवढं वाईट काहीच नाहीए. पण एके दिवशी त्याचं तसं वाटणं चुकीचं ठरलं. 

ही गोष्ट उन्हाळ्यातली आहे. झालं असं, की एक दिवस छोटा बाबा बाहेर खेळत होता. खूप उकाडा होता. अशात खूप पळाल्यानं छोट्या बाबाला खूप तहान लागली. तो पळत पळतच घरात घुसला. घरातले सगळे आपापल्या कामात होते. ते ‘पाय’ (अ‍ॅपल पाय सारखे इतर पदार्थ) करण्यात मग्न होते, पाहुण्यांसाठी टेबल सजवत होते. बाबानं स्वतःसाठी एका छोट्या जगमधून ग्लासभर पाणी ओतून घेतल्याचं कोणाच्याच लक्षात आलं नाही. उकळून गार केलेलं पाणी नेहमी त्यातच ठेवलेलं असतं हे बाबाला माहीत होतं. तो अर्धा ग्लास गटागटा प्यायला आणि घशात काहीतरी अडकलं. त्याला कळेचना काय झालं ते. आधी त्याला वाटलं त्यानं जिवंत हेजहॉग* गिळला आहे. मग त्याला वाटलं, की ते पाणी ठीकच होतं; पण त्यालाच काहीतरी होतंय. तो खूप घाबरला. त्याच्या मनानं घेतलं, की आता तो मरणार आहे. तो एवढा जिवाच्या आकांतानं ओरडला, की सगळे जण पळत त्याच्याजवळ आले. 

छोटा बाबा खोकत होता… त्याच्या घशात काहीतरी अडकलं होतं… त्याचं तोंड भाजत होतं… त्याला कसंतरीच होत होतं… आणि कोणालाच काहीच कळत नव्हतं की त्याला काय होतंय. 

‘‘त्याला अगदीच बरं वाटत नाहीए,’’ आजी काळजीच्या सुरात म्हणाली. 

‘‘काही नाही, तो नुसती नाटकं करतोय,’’ आजोबा म्हणाले. 

तेवढ्यात काय झालं ते बघायला बाबाला सांभाळणारी आजी आत आली. काय झालं असेल याचा तिला अंदाज आला. 

‘‘त्यानं व्होडका* प्यायलीए, त्या जगामध्ये व्होडका होती ना!’’ ती म्हणाली. 

मग सगळे जण जोरजोरात ओरडू लागले. 

‘‘आधी डॉक्टरला बोलवा,’’ आजी म्हणाली. 

‘‘मी त्याची चामडी लोळवीन!’’ आजोबा गरजले. 

‘‘आधी त्याला काहीतरी खायला द्या,’’ सांभाळणारी आजी म्हणाली.  

सँडविच खाता खाता छोटा बाबा पुटपुटला, ‘‘मला वाटतं, वाढत्या वयात व्होडकापण मुलांसाठी चांगली असते.’’ (घाण चवीच्या कॉडलिव्हर ऑईलसारखी!) 

अचानक बाबाला खूपच कसंतरी व्हायला लागलं. तो मटकन खालीच बसला. त्याला गरगरायला लागलं. त्यानंतर काय झालं बाबाला माहीतच नाही. पण बाकीच्यांनी नंतर त्याला सांगितलं, की तो दिवसभर झोपून राहिला. संध्याकाळ होताहोता त्याला बरं वाटू लागलं. रात्री पाहुणे आल्यावर व्होडका पिऊ लागले. बाबा दाराआडून त्यांच्याकडे पाहत होता. आता लवकरच त्यांनाही किती कसंतरी वाटणार आहे याचा विचार करून त्याला खूप वाईट वाटत होतं. तो त्यांना म्हणालासुद्धा, ‘‘ते भयंकर पेय पिऊ नका!’’

दुसर्‍या दिवशी सकाळी बाबाला बरंच बरं वाटलं. पण त्या जगातलं पाणी मात्र तो परत कधीच प्यायला नाही. व्होडका दिसली की तर तो हिरवाच पडायचा. 

बाबा ही गोष्ट खूप वेळा सांगतो. आणि मग तो त्याचं ठरलेलं वाक्य म्हणतो, ‘‘तेव्हाच मी दारू पिणं सोडलं!’’

*हेजहॉग : साळिंदरासारखा काटे असलेला प्राणी 

*व्होडका : रशियामध्ये प्रचलित असलेला दारूचा एक प्रकार

(समाप्त)   

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश  |  opreetee@gmail.com

अनुवादक पालकनीतीच्या संपादकगटाच्या सदस्य आहेत. त्या पूर्णवेळ आई असून लेखन, निसर्गस्नेही पालकत्व, बागकाम, शेती, पर्यावरण, शिक्षण हे त्यांचे आवडीचे विषय आहेत.

सौजन्य : अरविंद गुप्ता टॉईज