सहिष्णू समाजाच्या दिशेने एक पाऊल
डॉ. मंजिरी निंबकर
– ताई, ईद म्हणजे काय?
– आमचा सण असतो. आता रमजान ईद येईलच पुढच्या महिन्यात.
– रमजान म्हणजे काय?
– हा पवित्र महिना असतो. त्यात रोजे ठेवतात.
– रोजे म्हणजे उपास ना?
– हो. सकाळी सूर्योदयापूर्वी जेवायचं आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर. दिवसभर पाणीसुद्धा प्यायचं नसतं.
– लहान मुलंपण रोजे ठेवतात का?
– नाही. 10 वर्षांच्या वरची मुलं ठेवू शकतात. 10 वर्षांच्या वरच्या मुलांना कुराण, नमाज हे सगळं शिकवतात. पण ‘कंपल्शन’ नसतं. म्हातारी माणसं, आजारी माणसं रोजे ठेवत नाहीत.
– आम्ही ठेवू शकतो का?
– हो, ठेवू शकता.
– तुम्ही कुराण वाचता का?
– हो वाचते.
– ते कुठल्या भाषेत असतं?
– अरबीमध्ये.
– तुम्हाला समजतं का?
– सगळं समजत नाही. हफीजसाब सांगतात.
– आम्ही वाचू शकतो का?
– हो. आधी शिकावं लागेल. मग वाचता येईल. कुराण मराठीतसुद्धा आलं आहे.
***
आस्माताईंशी पाचवीतल्या मुलांच्या गप्पा चालल्या होत्या. आस्माताई आठवीतल्या आदिबाच्या आई. तर झालं असं, की पाचवीच्या मराठीच्या ताईंनी मुलांना ‘धारवाला सलीम’ हे पुस्तक वाचून दाखवलं. मुलांनी त्यातल्या काही शब्दांचे अर्थ विचारले. बीबी म्हणजे काय, रमजान ईद म्हणजे काय, वगैरे. बीबी म्हणजे बायको हे ताईंनी सांगितलं; पण रमजान ईद म्हणजे मुस्लिमांचा सण असतो याव्यतिरिक्त आपल्याला काहीही माहीत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. वर्गात एकही मुस्लीम मूल नसल्यानं कुणी सांगणारंसुद्धा नव्हतं. मग काय करावं? मुलांना ही माहिती द्यायला बालवाडीच्या निलोफरताईंना बोलवावं की कुणा पालकांना? आठवीतली आदिबा शाळेच्या जवळच राहते. तिच्या आईला विचारलं, तर त्या लगेच तयार झाल्या.
– अल्ला म्हणजे कोण असतं?
– अल्ला म्हणजे कुणी माणूस नसतो. अल्ला म्हणजे नूर असतो. तेजाचा गोळा.
– त्यांचा फोटो का नसतो?
– त्यांना कुणी पाहिलेलंच नाही ना! फक्त मुहम्मद पैगंबरांनी पाहिलं होतं. म्हणून त्यांनी अल्लाचा संदेश आपल्यापर्यंत पोचवला म्हणतात.
– पीर म्हणजे काय?
– मराठी समाजात गुरू असतात ना? तसे मुस्लीम समाजात पीर असतात. सगळ्यांचे पीर वेगवेगळे असतात.
– त्याची पूजा कशी करतात?
– चादर चढवून, हार-फुलं वाहून.
– हिरवीच चादर चढवावी लागते का?
– नाही, असं काही नाही. पांढरी, केशरी कुठल्याही रंगाची चालते.
– दर्गा म्हणजे काय?
– मुस्लीम लोकांच्यात जे संत असतात ना, त्यांचं निधन झाल्यावर त्यांची कबर बांधतात. तो दर्गा असतो.
– तुम्ही कुठल्या दर्ग्याला गेला आहात का?
– हो. अजमेरला, गुलबर्ग्याला, विशालगडावर.
***
आस्माताईंची ओळख करून दिल्या दिल्या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली होती. त्यांची दोन्ही मुलं आमच्या शाळेत असल्यानं मुलांनी त्यांना अनेकदा शाळेत पाहिलेलं आहे. त्यामुळे मुलं काही बुजली-बिजली नाहीत. मुलांना खूप प्रश्न होते आणि त्यांची उत्तरं घरून मिळण्याची शक्यता नव्हती.
नमाज म्हणजे काय?
– अल्लातालाची तारीफ आहे. प्रार्थना आहे.
– नमाज पढताना तुम्ही हाताची ओंजळ का करता?
– प्रार्थना करताना तुम्ही हात जोडून करता. आम्ही ओंजळ करून. शेवटी आपण मागणेच मागत असतो.
– आम्ही नमाज पढली तर चालेल का?
– हो. पण तुम्हाला आधी ती शिकावी लागेल. ते सुरे पाठ करावे लागतील.
– मशिदीतून जोरात आवाज येतो तो काय असतो?
– ती अजान असते. म्हणजे नमाज पढायला या असं बोलावणं असतं. पूर्वी लोकांच्याकडे घड्याळं नव्हती. त्यामुळे त्यांना आवाज द्यायला लागे.
***
मुस्लिमांचे सण, पदार्थ, बुरखा, नमाज, भेटण्याची पद्धत, भाषा, मुस्लिमांमधील जाती वगैरे अनेक बाबींवर प्रश्नोत्तरं जवळजवळ दीड तास चालली होती. ही सर्व चर्चा प्रश्नोत्तरांच्या रूपात असल्यानं मुलांच्या मनातील प्रश्नांना उत्तरं मिळत होती. प्रश्नोत्तरं एकूणच खूप खेळीमेळीच्या वातावरणात झाली.
फलटणमध्ये मुस्लीम समाज बर्यापैकी मोठा आहे. मुख्य म्हणजे हिंदू-मुस्लीम घरं मिसळून आहेत. अगदी ब्राह्मण आळीतदेखील जुनी मुस्लीम घरं आहेत. शुक्रवार पेठेत तर दत्त मंदिराला लागून त्याच रांगेत मागे मुस्लीम घरं, रस्त्याच्या दुसर्या बाजूला हिंदूंची घरं. चौकात एक गणपती मंदिर आणि त्याला लागून एक मशीद. पुढे त्या आळीला जैन समाजाची घरं आणि मंदिर. हे सर्व फलटण संस्थानाचे सेवेकरी होते. त्यांना राजवाड्याच्या जवळपास जागा दिल्या गेल्या. फलटणमध्ये आत्तापर्यंत कधी हिंदू-मुस्लीम दंगे झालेले नाहीत. मला वाटतं त्याचं कारण या सरमिसळीत आहे.
नंतर ताईंनी मुलांना आस्माताईंसाठी आभारपत्रं लिहायला सांगितली. एका मुलानं आवर्जून लिहिलं होतं, की आमच्या वर्गात एकही मुस्लीम मुलगा नाही. त्यामुळे आम्हाला मुस्लीम लोकांबद्दल काहीसुद्धा माहिती नव्हती. अकरा वर्षांच्या या मुलानं शिक्षणातील व समाजातील जाती, धर्म, वर्ण, आर्थिक स्तर, भाषा या मुद्द्यांवर होत असलेल्या ध्रुवीकरणावर बोट ठेवलं आहे. आयबी शाळा, सीबीएसई बोर्डाच्या शाळा, इंग्रजी माध्यमाच्या ग्रामीण शाळा, गुरुकुले, मदरसा, आश्रम शाळा, सरकारी शाळा, अशा या उतरंडीमुळे मुलं आपल्या देशाच्या समृद्ध विविधतेला पारखी होत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी ‘गोवंश हत्याबंदी झालीच पाहिजे’ आणि ‘लव-जिहाद कायदा झाला पाहिजे’ म्हणून ‘अखिल हिंदू समाज’ अशा बॅनरखाली निघालेला मोर्चा ही एकच विसंवादी गोष्ट माझ्या स्मरणात आहे.
पाचवीची मुलं आजूबाजूला दिसणार्या, ऐकू येणार्या गोष्टींचा अर्थ लावू पाहत होती आणि आस्माताई त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला सहज, साधी, प्रॅक्टिकल उत्तरं देत होत्या. मुलांच्या दोन प्रश्नांनी मात्र मला पूर्ण हादरवून टाकलं. आस्माताईंनी त्या प्रश्नांचीही सहज उत्तरं दिली; परंतु त्या चाणाक्ष बाईंच्या लक्षात त्यातील खोड आली होती. त्यांनी प्रसंग आणि मुलांचं वय लक्षात घेऊन ते प्रश्न हाताळले. ते प्रश्न असे – 1) तुमच्यात गुन्हा झाला तर तुम्ही कुठे तक्रार करता? आणि 2) तुमचं वेगळं राष्ट्रगीत आहे का? आस्माताईंचं उत्तर होतं, ‘‘आपण सगळे भारतीयच आहोत. त्यामुळे आपले कायदे एकच आहेत. म्हणून गुन्हा घडला तर आम्ही पोलिसातच तक्रार करतो. आणि जन गण मन हेच आपलं सर्वांचं राष्ट्रगीत आहे.’’
आज अनेक घराघरांमधून, टी.व्ही., व्हॉट्सप, चित्रपट यांच्या माध्यमातून, राजकीय मंचांवरून मुस्लिमांबद्दल चुकीच्या,
विखारी गोष्टी, गैरसमज पसरवले जात आहेत. वर्गातील मुस्लीम मुलांबरोबर खेळू नकोस असं सांगितलं जातं. त्यामुळे मुस्लीम संस्कृती स्वतः अनुभवणं, आपल्या व दुसर्या संस्कृतीतल्या माणसांचा आणि त्यांच्या आचारविचारांचा सारखेपणा-वेगळेपणा आपल्या स्तरावर समजून घेणं होत नाही. त्यामुळे मुलं घरातल्या मोठ्यांची किंवा आजूबाजूच्या प्रभावी व्यक्तींची मतंच बोलून दाखवतात.
या अनुभवानंतर एक शाळा म्हणून प्रत्येक शाळेनं काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत असं मला वाटतं. पहिलं म्हणजे समाजाच्या सर्व स्तरातली मुलं शाळेत असावीत यासाठी प्रयत्न करावेत. तेच शिक्षकांच्या बाबतीतही खरं आहे. वरील सर्व घटनेची सुरुवात एका गोष्टीच्या पुस्तकातून झाली हे लक्षात घेता शाळेत समावेशक पुस्तकं असावीत, वाचली जावीत आणि त्यावर संवाद व्हावा. मुख्य म्हणजे मुलं काय म्हणू पाहत आहेत ते नीट, गंभीरपणे ऐकावं आणि सर्व प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकणार नाही ही नम्रता अंगी बाणवावी. शाळेच्या सुरक्षित वातावरणात विविध समाजाच्या लोकांना निमंत्रित करून मुलांना त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा करण्याची संधी द्यावी. उपदेश आणि भाषणातून नाही, तर मुलं स्वतः ज्यात पुढाकार घेत आहेत अशा संवादातून लहान वयातच मुलांच्यात सहिष्णुतेची बीजं पेरावीत.
डॉ. मंजिरी निंबकर
manjunimbkar@gmail.com
लेखक वैद्यकीय पदवीधर आहेत. फलटणच्या प्रगत शिक्षणसंस्थेच्या विश्वस्त. मुलांसाठी भाषा शिक्षणाच्या कामात विशेष रस. त्यांनी शिक्षणशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आग्रह धरणार्या गटात सक्रिय सहभाग.