हार्ड टाईम्स (पुस्तक परिचय)

रेणू गावस्कर

या वेळी चार्ल्स डिकन्सच्या ‘हार्ड टाईम्स’ शिक्षणविषयक कांदबरीवर माहितीघरात बोलाल का? अशी विचारणा पालकनीतीकडून झाल्यावर मी ती सहजी स्वीकारली. ‘हार्ड टाईम्स’ पूर्वी वाचली होती. खूप आवडली होती. मात्र कथनाच्या दृष्टीनं कादंबरीचा विचार नव्यानं सुरू केल्यावर ते काम तितकंसं सोपं नाही असं प्रकर्षानं जाणवलं.

मला कथा सांगण्याची सवय आहे. कथेला, मग ती दीर्घकथा का असेना सहसा पृष्ठ मर्यादा असल्यानं कथाकार एका सलग सूत्रात घटना ओवत जातो. त्यामुळे ती सुसूत्रतेनं सांगणं सहज होतं. कादंबरीत अनेक पात्रं तर असतातच पण अनेक घटना, कितीतरी कथावस्तू यांची एक मजेदार सरमिसळ झालेली असते. परिणामी, कादंबरी सांगणं तुलनेनं अवघड होतंय असं वाटलं.

चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीतली पात्रं, घटना, आणि कथावस्तू यांची सरमिसळ तर अतिशय वेगळी. चार्ल्सच्या बालपणातील आठवणी, कादंबरी आकार घेताना असलेल्या सामाजिक परिस्थितीचं भान आणि त्याविषयीचा सहानुभाव याशिवाय कादंबरीचा प्रारंभ करीत असतानाचा हेतू, वेगवेगळ्या प्रसंगातून एखाद्या प्रत्यंचेसारखा शेवटपर्यंत अत्यंत उत्कंठापूर्ण रीतीनं ताणत नेण्याचं त्याचं अलौकिक कौशल्य, या सार्‍यांचा अभ्यास करण्याची ही एक नामी संधी होती आणि ती मी साधली.

ही कादंबरी चार्ल्स डिकन्स यांच्या इतर कादंबर्‍यांपेक्षा वेगळी आहे. सर्वात लहान, शिवाय दु:खान्त. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे डिकन्स यांच्या मनात कादंबरीचा विषय वर्षानुवर्ष रेंगाळत राहिला, कथानक मनातल्या मनात आकार घेत राहिलं व तब्बल पंधरा वर्षांनंतर कागदावर उतरलं.

आता कादंबरीच्या मूळ कथाभागाकडे वळूया.

थॉमस ग्रेडग्राईंड आणि बाऊंडरबाय हे दोघे जीवश्‍चकठश्‍चं मित्र. अर्थात ते परस्परांचे जानी दोस्त असावेत याच कारणही तसंच होतं म्हणा! अंक, आकडे, वास्तव, सत्य घटना यांच्याशीच आणि फक्त यांच्याशीच माणसाचा संबंध असला पाहिजे यावर ठाम विश्वास असणारी ही जोडगोळी. डिकन्स आपल्या या पात्राचं वर्णन करताना म्हणतात, ‘‘थॉमस ग्रेडग्राईंड एक वास्तविक माणूस. घटना आणि घडामोडी यांचा माणूस. दोन अधिक दोन बरोबर चारच, त्यात अधिक उणे काही नाही या तत्त्वावर ठामपणे चालणारा माणूस. थॉमसच्या खिशात एक पट्टी, मापनाचा तराजू आणि आकडेमोडीचा तक्ता नसेल असं कालत्रयी होणार नाही. माणसाच्या प्रवृत्ती पट्टीनं मोजून, तराजूनं मापायच्या आणि शेवटी आकडेमोडीचा तक्ता वापरला की माणसाच्या स्वभावाचा खुलासा झालाच म्हणून समजा. आहे काय आणि नाही काय? सर्व मानवी प्रश्न म्हणजे केवळ आकडेमोडीचा ताळेबंद, बस्स. याहून वेगळं काही असतं या जगात, हे तुम्ही एखाद्या जॉर्जच्या, एखाद्या ऑगस्टस्च्या किंवा एखाद्या जॉनच्या डोक्यात घालू शकाल पण थॉमस ग्रेडग्राईंडच्या? छे, छे ते सर्वस्वी अशक्यच.’’

बाउंडरबाय आणि थॉमस एकमेकांचे दोस्त. अगदी खास दोस्त. ही मैत्री म्हणजे भावनेशी अजिबात फारकत घेतलेल्या माणसाला भावनाशून्य अशा दुसर्‍या माणसाविषयी जे काही वाटतं ते म्हणजे या परस्परांची मैत्री. बाउंडरबायची व्यक्तिरेखा अशी सादर केली आहे – ‘‘बाउंडरबाय एक श्रीमंत माणूस होता. सावकार होता, व्यापारी होता, निर्माता होता. थोडक्यात, बाउंडरबाय सगळं काही होता म्हणा ना! 

भरभक्कम देहयष्टि लाभलेल्या या माणसाचं दिसणं, असणं, हसणं सगळंच काही धातूच्या कोरीव कामासारखं. त्याचं ते मोठ्ठं डोकं, चेहेर्‍याच्या बाहेर डोकावणारं भलं थोरलं कपाळ, कपाळावरच्या फुगलेल्या ताठर शिरा, ताणलेली त्वचा आणि पूर्ण उघडलेले डोळे! बाउंडरबाय नावाचा तो माणूस म्हणजे आकाशात उड्डाण करण्यासाठी केव्हाही सा असलेला फुगाच वाटायचा. मात्र हा फुगलेला फुगा आपल्या भूतकाळाला क्षणभरही नजरेआड होऊ देत नसे. सेल्फ मेड मॅनची बिरुदावली क्षणभरही नजरेआड न करणारा मॅन म्हणजे बाउंडरबाय.’’

या दोन मित्रांनी भावनेच्या जगाशी कायमची फारकत घेतल्याने त्यांचा संबंध वास्तवाशी आणि वास्तवाशीच राहाणार हे तर सूर्यप्रकाशाइतकं उघड नाही का? फक्त वाईट एवढ्याचंच वाटतं की शाळेचे व्यवस्थापक आणि हेडमास्तर या नात्यांनी वास्तवाचं हे भयंकर ओझं हातात सापडलेल्या मुलांच्या माथ्यावर मारायला ही ‘वास्तविक दुक्कल’ सदैव तयार असायची.

ग्रेडग्राईंड सरांनी एका वर्गावर जाऊन मुलांना आणि शिक्षकांना उद्देशून जी मुक्ताफळं उधळली त्याची ही छोटीशी झलकही या द्वयीच्या विचारांचा परिचय वाचकांना करून द्यायला पुरेशी आहे.

‘‘वास्तव, वास्तव आणि वास्तव. मला जर काही हवंसं असेल तर ते म्हणजे केवळ वास्तव. या मुलांना वास्तविकतेखेरीज काही म्हणजे काहीच शिकवू नका. केवळ तेच आणि तेवढेच या विद्यार्थ्यांमध्ये रुजवा. बाकी सारे टाका उपटून आणि द्या फेकून. याच तत्त्वांवर मी माझ्या मुलांना मोठं केलं आणि याच तत्त्वांना घट्ट पकडून मी याही मुलांना वाढवू इच्छितो.’’

डिकन्सनी लिहिलंय, ‘‘वर्गाचं ते दृश्य मोठं विलक्षण होतं. असं वाटत होतं की त्या वर्गात मुलं नाहीतच मुळी. छोटी, छोटी उघड्या तोंडाची भांडी रांगेनं लावून ठेवली आहेत. आपल्या या उघड्या मडक्यात वास्तवाची धार काठोकाठ भरून ओसंडायची वाट बघत बसली आहेत बिचारी.’’

हेडमास्तर महाशय घरी परतताना त्यांचं मन दिव्य भावनांनी भरून जातं. मुलांना स्वप्नरंजनापासून तोडून, कल्पनेच्या विश्वात विहरण्याची परवानगी न देता त्यांना वास्तवाचे धडे देऊन आपण फार मोठं कार्य करीत आहोत याविषयी त्यांच्या मनात कोणतीही शंका नाही. आपण आपल्या मुलांना या आदर्श पद्धतीनं वाढवल्यामुळेच ती अद्वितीय व असामान्य होणार आहेत याविषयीची मनोमन खात्री बाळगत हेडमास्तर घरी परतत असतानाच त्यांच्या या स्वप्नांना तडा जाईल असं एक दृश्य त्यांच्या नजरेस पडतं. (खरंतर हेडमास्तरांना स्वप्न दिसतं असं म्हणणं चुकीचं आहे. कारण जागेपणी स्वप्न पाहणं म्हणजे वास्तवाशी पूर्ण फारकत घेतल्यासारखंच आहे.) त्यांची दोन मुलं – रस्त्यावरचा एक मजेचा खेळ पाहण्यात मग्न दिसतात. त्यांचं सारं मनस्वास्थ्यच हरपतं. आपल्या ‘वास्तव’ कोळून प्यायलेल्या मुलांनी ह्या अशा रस्त्यावरच्या सर्कशीच्या खेळाचं दृश्य पाहण्यात आजूबाजूचं वास्तव जग विसरावं याची एक विलक्षण उद्विग्नता हेडमास्तरांच्या मनात दाटून येते. आपल्या मुलांनी अशा प्रकारचं बालिश वर्तन करू नये यासाठी एकाही प्रयत्नाची कमी ठेवली नसताही असं व्हावं म्हणजे उरीपोटी बाळगलेल्या वास्तव तत्त्वांचा संपूर्ण पराभवच की!

आपल्या मुलांचं हे असं होऊ नये म्हणून त्यांना ‘जिंगल बेल, जिंगल बेल’ सारखी काल्पनिक सांतायलॉज रंगवणारी बालगीतं हेडमास्तरांनी शिकवली नाहीत, अंगठ्याएवढ्या टॉम थम्बची अथवा थम्बलिनाचीही परीकथा कधी ऐकवली नाही. शिंगं मोडलेल्या गायीची गंमतीदार गोष्ट कधी सांगितली नाही.

लुईसा आणि थॉमस ही या पित्याची दोन बालकं वडिलांना पाहिल्यावर सर्कशीचा तो विलक्षण चित्ताकर्षक खेळ सोडून, वडिलांबरोबर अपराधी मनानं घरी परततात हे काय वेगळं सांगायला हवं?

स्वप्नं रंगवणं, कल्पनेच्या जगात हरवून जाणं, सृजनाच्या विविध क्षेत्रात उंच भरारी मारणं या सार्‍या बालपणाच्या उत्कट आनंदाला वंचित झालेली थॉमस आणि लुईसा ही मुलं. त्यांच्या जोडीला सिसीलिया ही पोरकी मुलगी आणली जाते. मुलांच्या वाट्याला आलेल्या वास्तवाने त्यांच्या भावजीवनावर केवढा भीषण परिणाम होतो, किंबहुना त्यांचं भावविडच उद्ध्वस्त होऊन जातं याचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण म्हणजे ‘हार्ड टाईम्स.’

कादंबरीला अनेक उपकथानकं जोडली आहेत. तरीही पन्नाशीचा बाऊंडरबाय विशीच्या लुईसाशी विवाह करण्याचं कारस्थान तिच्या दहाव्या वर्षापासून रचतो. तेव्हापासूनच पत्नी म्हणून तिचं निरीक्षण करतो व या किळसवाण्या, घृणास्पद प्रकाराला वास्तवाची झूल चढवतो हा सगळा भाग रंगवताना चार्ल्स डिकन्सनी मोठ्यांच्या तत्त्वातिरेकापायी मुलांची होणारी होरपळ हाच कादंबरीचा गाभा मानला आहे.

ज्या नवर्‍यावर लुईसा कधीच प्रेम करू शकली नाही त्याला सोडून ती अखेर आपल्या वडिलांकडे येते तेव्हा वडिलांशी झालेला तिचा संवाद डिकन्सच्या मनातील शिक्षणाची कल्पना स्पष्ट करतो. लुईसा दु:खातिरेकानं वडिलांना म्हणते, 

‘‘तुम्ही जन्मापासून मला शिक्षण देत आलात, मला वाढवलंत. ज्या जन्मानं मला या अशा जीवनाला सामोरं जावं लागलं त्याचाच मी द्वेष करते.’’

वडील शिस्तप्रिय असले, वास्तवाचंच अस्तित्व मान्य करीत भावनांना नगण्य समजणारे असले तरी त्यांच्याही नकळत त्यांच्या अंतरंगात मुलीविषयी पित्याचं प्रेम आहे, काळजी आहे, जिव्हाळा आहे. आपल्या मुलीच्या मनात इतकं काही खदखदत असेल याची त्या माणसाला अजिबात कल्पनाच नाही. पण आता मुलगी थांबण्याच्या मनस्थितीत नाही. आपल्या पित्याला दोष देण्याचा, त्याला दुखावण्याचा, अगर त्याचा अपमान करण्याचा उद्देश नसतानाही तिच्या हृदयाची वेदना शब्दरूप घेते. लुईसा तिचं अंत:करण मोकळं करताना म्हणते, ‘‘आज माझ्या ओठांवर येणारे शब्द फार पूर्वी आले असते तर? तुम्ही त्यासाठी मला किंचित, अगदी किंचित मदत केली असतीत तर? मी तुम्हाला त्याबद्दल दोष देत नाही कारण तुम्हाला स्वत:ला या कशाचीच जाणीव नाही. पण तरीही मी तुम्हाला विचारते की माझ्या आत्म्याचं सौंदर्य कुठं आहे? कुठं आहेत माझ्या हृदयीच्या भावना? कुठं लोपलं ते सारं? कुठं अदृश्य झालं?’’

पण एवढंच विचारून लुईसा थांबत नाही. आता तिला थांबणं अशक्य तर आहेच पण असह्यही आहे. आयुष्यभर दबलेले भावनेचे हुंकार कशालाही न जुमानता बाहेर पडताहेत. ती वडिलांना विचारते, ‘‘लहानपणापासून मला शिकवलंत काय की हृदयात उमटणार्‍या गोष्टी दाबून, दडपून टाकायच्या, त्यांना ओठांपर्यंत येऊच द्यायचं नाही. पण आज विचारते मी तुम्हाला की माझ्या हृदयात प्रेम, भावना, जाणिवा तर आहेतच पण ज्यांचं रूपांतर सबलतेत होऊ शकेल अशा दुर्बलताही आहेत, याची कल्पना होती तुम्हाला? भावना, ज्या कुठल्याही माणसानं केलेल्या आकडेमोडीला जुमानत नाहीत, त्याच्या गणिती ठोकताळ्यांच्या कक्षेत बसत नाहीत अशा भावना माझ्या हृदयात आहेत याची जाणीव तुम्हाला असती तर ज्याच्यावर प्रेम तर नाहीच पण या घटकेला ज्याचा मी द्वेष करतेय अशा माणसाशी माझं लग्न लावून दिलं असतंत तुम्ही?’’

मुलीच्या या सरबत्तीनं गांगरून गेलेले वडील ‘नाही, नाही’ एवढीच कबुली देऊ शकतात. पण मुलगी थांबत नाही. तिला दिल्या गेलेल्या शिक्षणाबद्दल ती म्हणते, ‘‘जे मी शिकले त्यानं मला दिलं काय, तर जे शिकले नाही त्याविषयी संशय, शंका, अविश्वास आणि पश्‍चात्ताप. त्या शिक्षणानं विचारसरणी घडली ती एवढीच की मानवी आयुष्य एक ना एक दिवस संपायचंच. त्यातल्या दुर्मिळ गुणांसाठी झगडावं असं टिकाऊ त्यात काहीच नाही.’’

अखेरीला आपलं दु:ख तळमळीनं व्यक्त करतांना लुईसाच्या तोडात येतं, ‘‘यापेक्षा मी आंधळी असते तर किती बरं झालं असतं! निदान चुकत माकत, चाचपडत माझा रस्ता शोधून काढण्याचं स्वातंत्र्य तर मला राहिलं असतं! निदान काही कल्पना तरी मी करू शकले असते. या माझ्या उघड्या डोळ्यांनी, कल्पनेचं भरारी घेणारं ते भावविडच माझ्याकडून हिरावून घेतलं.’’

लुईसाच्या तळमळणार्‍या मनाच्या विस्फोटानंतर कादंबरीच्या कथानकावर अधिक काही लिहिण्याची जरुरी आहे असं वाटत नाही. पण ‘हार्ड टाईम्स’ या कादंबरीला मिळालेला तत्कालीन प्रतिसाद मात्र नोंदवावासा वाटतो.

ही कादंबरी चार्ल्स डिकन्स यांनी थॉमस कार्लाईल या थोर विचारवंताला अर्पण केली होती. कार्लाईल यांनी कादंबरीचं मन:पूर्वक गुणगान केलं आहे. जॉन रस्किन यांनी एकापेक्षा अधिक कारणांसाठी डिकन्स यांची ही कादंबरी ‘सर्वश्रेष्ठ’ आहे असं तर नमूद केलं आहेच पण ‘ज्या व्यक्तींना सामाजिक प्रश्नांमध्ये रस आहे अशा सर्वांनी या कादंबरीचा सखोल अभ्यास केला पाहिजे’ असं लिहून ठेवलं आहे. सिग्मंड फ्रॉईड यांनी ‘हार्ड टाईम्स’ची ‘क्रूर पुस्तक’ अशी संभावना केली आहे. फ्रॉईड यांच्या मते ‘हे पुस्तक वाचताना एखादा खरखरीत ब्रश घेऊन कोणीतरी आपलं अंग खराखरा घासून काढतंय अशी भावना होते.’ मात्र बर्नार्ड शॉ यांनी फ्रॉईड यांच्या या प्रतिक्रियेला उद्देशून लिहिलं की कादंबरीचं श्रेष्ठत्व खरंतर यातच सामावलेलं आहे. ते म्हणतात, ‘‘हार्ड टाईम्स तुम्हाला अस्वस्थ करण्यासाठीच लिहिली गेली. कादंबरी वाचकांना अस्वस्थ करून सोडते, बेचैन करते आणि म्हणूनच कदाचित ती त्यांना आवडते. हार्ड टाईम्स तुमच्यावर एक न पुसणारा व्रण ठेवते एवढं मात्र खरं.’’

अस्वस्थ करून सोडणार्‍या, बेचैनी आणणार्‍या, मनावर कायमचा व्रण ठेवणार्‍या या कादंबरीचा सखोल अभ्यास पालकनीतीच्या वाचकांकडून व्हावा असं वाटतं.

चौकट : 

कादंबरीचा रोख शिक्षणव्यवस्थेकडे तर आहेच पण इतरही अनेक सामाजिक प्रश्नांना ती स्पर्श करीत वळणावळणानं पुढं जाते. उदाहरणार्थ, तत्कालीन इंग्लंडमध्ये (1854) कायदेशीर घटस्फोट संमत नसल्यानं माणसांची कशी भावनिक कुचंबणा होत होती हे स्टीफन आणि रॅशेल यांच्यातील हळूवार प्रेमबंधनाच्या माध्यमातून डिकन्स यांनी चित्रित केलं आहे. यातही डिकन्स यांच्या वैयक्तिक जीवनाचा संदर्भ डोकावतोच. चार्ल्स डिकन्स आणि कॅथरीन डिकन्स हे जोडपं बावीस वर्षांच्या विवाहकालानंतर विभक्त झाले. कॅथरीन घरातून निघून गेली (की तिला जावं लागलं?). आपल्या वेगळं होण्याची कारणमीमांसा देताना चार्ल्सनी म्हटलंय, ‘आमचे सूर प्रांरभापासूनच कधी जमले नव्हते. विसंवाद विकोपाला गेला तेव्हा विभक्त होणं अपरिहार्य झालं.’

पण त्या काळात चार्ल्स एलन नावाच्या अभिनेत्रीक़डे आकर्षित झाले होते असा जोरदार प्रवाद होता. त्या काळी कायदेशीर घटस्फोट शक्य नव्हता आणि एलननं लग्नाशिवाय तसंच आपल्याजवळ राहावं हे डिकन्स यांच्या नैतिक कल्पनेत अजिबात बसणारं नव्हतं. परिणामी बावीस वर्षांच्या लग्नबंधनानंतर चार्ल्स यांच्या वाट्याला अगदी एकाकीपण आलं. कादंबरीतल्या स्टीफन आणि रॅशेल यांचं भावगर्भ, उदात्त प्रेमबंधन रंगवताना डिकन्स यांच्या आयुष्यातील या घटनांची आठवण सहजपणे येते.