बसवंत विठाबाई बाबाराव
आज पहिल्यांदाच अनुज आणि अमृता ही भावंडे ‘आनंदशाळे’त उशिरा आली.
नेहमी सगळ्यात आधी येणाऱ्या ह्या मुलांना आज उशीर का झाला असेल?
त्यांची नेहमीची पुढची जागा टाळून ती मागे कोपऱ्यात जाऊन बसली तेव्हा हा प्रश्न माझ्या मनात अधिक गडद झाला.
उशिरा येण्याचे नक्कीच काहीतरी मोठे कारण असेल… माझी शंका तीव्र झाली.
मात्र काही जाणवू न देता मी नेहमीचा दिनक्रम सुरू केला.
काही गाणी घेतली. गोष्ट वाचून दाखवली.
गेल्या आठवड्यापासून आम्ही टक्केवारी हा विषय शिकत होतो. सरावासाठी मुलांना काही उदाहरणे देऊन त्यांचे गृहपाठ तपासायला सुरुवात केली.
` गृहपाठात मी मुलांना त्यांच्या स्वतःच्या शेतीत काय काय पेरले आहे, किती एकर जागेत पेरले आहे, हे लिहून आणायला सांगितले होते. यातून त्यांना काही आकडेमोड शिकवता येईल असा माझा उद्देश होता. शिवाय ती शेतीशी जोडली जातील, त्यांना शेतशिवाराचे ज्ञान होईल, पीकपाणी, त्याचे प्रश्न यांची तोंडओळख होईल. आणि ती संवाद करून श्रुतलेखन करायलाही शिकतील.
संजय, कपिल, अक्षरा, पूजा, महादू, मनीषा, महादेवी… एक एक करत सर्वांनी गृहपाठ दाखवले.
प्रत्येक पिकानुसार मुलांनी पीक आणि ते किती एकरात पेरले ते लिहिले होते.
आता त्यांना थोडे पुढचे काम दिले.
“मुलांनो, आता तुम्ही प्रत्येक पिकासमोर किती बियाणं लागलं याची माहितीदेखील लिहून आणायची आहे. त्यातून एकरी कोणतं बियाणं किती लागतं याचा आपल्याला हिशेब मांडता येईल.”
हा विषय महादूच्या जिव्हाळ्याचा. पेरणी सुरू असताना तर एक-दोन आठवडे तो शाळेचे नावदेखील घेत नाही.
लगेच महादूने आपली शंका उपस्थित केली, “सर कोणी थोडं दाट पेरतात, आणि कुणी पातळ (विरळ) पेरतात. सगळ्यांचं एकसारखं राहत नाही, मग कसं मोजता येईल.”
“सरासरी काढायचं आपण शिकलो आहे न महादू?” मी विचारले.
“हो, सर.”
महादूला उलगडा झाला खरा, पण त्याला थोड्याफार शंका आहेत असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसले.
मी म्हणालो, “तुम्ही सर्वांनी पेरलेल्या शेतीचं क्षेत्र आणि लागलेलं बियाणं अशी माहिती उद्या लिहून आणलीत, की मग सरासरी कशी काढायची हे उद्या करून बघूया,”
सर्वांना हे पटलं.
आज अमृता-अनुज दोघे एकूणच शांत आणि नाराज वाटत होते.
सरावाचे बरेच प्रश्न करून झाले. आता प्रार्थनेची वेळ होत आली होती.
“आजच्या प्रार्थनेसाठी कोण समोर येईल?” मी मुलांना उद्देशून विचारले.
वर्षा आणि मनीषा दोघी पुढे आल्या.
‘खरा तो एकची धर्म…’ ही सानेगुरुजींची प्रार्थना झाली आणि एकेक करून सगळी मुले घरी निघाली.
अमृता-अनुजही दबक्या पावलांनी घरी जाण्यास निघाले.
“अमृता, अनुज! थोडं थांबा! बाबांना देण्यासाठी एक पुस्तक काढून ठेवलं आहे.”
शेतीतून सवड मिळाली की नागनाथ वाचायचा. अधूनमधून मी त्याला माझ्याकडील पुस्तके देत असतो.
अमृता-अनुज मागे थांबली. सगळी मुले बाहेर गेल्याचे दिसल्यावर अमृता हळूच बोलायला लागली, “बाबांनी पुस्तक द्यायला सांगितलं आहे का?”
“नाही, खूप दिवस झाले पुस्तकं नेली नाहीत, म्हणून मीच द्यावं म्हटलं.”
“पण तुम्ही दोघं आज शांत का?”
“सर, काही नाही!”
सुरुवातीला अमृताने कारण सांगण्याचे टाळण्याचा थोडासा अपयशी प्रयत्न केला; मात्र नंतर तिचा बांध फुटला.
“अरे अमृता, काय झालं? शांत हो बरं.” मी तिला सावरण्याचा प्रयत्न केला.
हुंदके देतच ती सांगू लागली, “रात्रीपासून बाबा जेवतच नाही आहेत, कामालापण जात नाहीयेत, बोलतपण नाहीत.”
काही अडचण असली, मदत लागली तर नागनाथ लगेच माझ्याशी बोलतो. दोन-तीन दिवस झाले माझेही त्याच्याकडे जाणे झाले नव्हते. नेमके काय झाले असेल? मला काळजी वाटायला लागली.
“का ग? नेमकं काय झालं?” अमृताला मी विचारले.
“माहिती नाही सर, पण आठवडा झाला सोयाबीन उगवलंच नाही, मोडच आले नाहीत असं बाबा रात्री फोनवर बोलत होते.”
मला अंदाज आला. बियाणे आणताना मीच तर सोबत होतो. जास्त उत्पन्न मिळेल म्हणून महागडे बियाणे घेतले होते. या वर्षी चारही शेतांत सोयाबीन पेरले होते.
मी सांगत होतो, “नागनाथ, थोडे उडीद, मूगपण पेरायला हवे. खायला डाळी होतील.”
पीक काढणीवेळी पाऊस येतो. उडीद, मूग ही नाजूक पिके लवकर खराब होतात. डाळी काय विकत घेता येतील. म्हणून त्यानी सगळे सोयाबीन पेरले होते.
पेरणी म्हणजे बियाणे, खते, पेरणीचा खर्च, बियाणे बाजारातून घरी आणि घरून शेतीत नेण्याचा खर्च. हे सर्व करून बी उतरलेच नाही तर मग हा सगळा खटाटोप व्यर्थ गेला.
“मी येईन थोड्या वेळानी, तुम्ही जा घरी,” मी अमृता-अनुजला घरी जाण्यास सांगितले.
अधूनमधून मी नागनाथकडे चहा घेण्यासाठी जात असे. गेल्यावर ‘अमृता सर आलेत, आईला काढा करायला सांग, सर चहा पीत नाहीत’ म्हणत हसत स्वागत करण्याची त्याची नेहमीची पद्धत.
आजही आपली नाराजी, दुःख लपवत त्याने काढा करण्यास सांगितला. मी सगळी परिस्थिती समजून घेतली. गावातील पाच-सहा लोकांचे मिळून एकूण वीस-पंचवीस एकरात बियाणे उतरले नव्हते. दुकानदाराशी बोलून झाले होते. चढ्या किमतीने बियाणे विकण्यासाठी म्हणून दुकानदाराने कोणतीही पावती दिली नव्हती. त्यामुळे तो कंपनीकडे याची तक्रारही करत नव्हता. एकूण प्रश्न गंभीर होता. सारे नुकसान शेतकऱ्यांनाच सोसावे लागणार होते.
बियाण्याच्या पोत्यासोबत त्यांची उगवण टक्केवारीची कागदपत्रे जोडलेली होती. मात्र नमुन्यादाखल त्या पोत्यातील थोडेही बियाणे ठेवले नव्हते. बियाण्याची उगवण-क्षमता तपासूनच पेरायला हवे याबद्दल मी अधेमध्ये बोललो होतो. आजवर असा प्रसंग कधीच आला नसल्याने लोकांनीही ते गांभीर्याने घेतले नव्हते.

थोडा धीर देत नागनाथला बोलते केले. मागच्या काही वर्षांत आलेली संकटे कशी हाताळली होती याची त्याला आठवण करून दिली. थोडे विनोदी प्रसंग, हलक्याफुलक्या आठवणी काढल्या. रात्रीच्या जेवणाची वेळ होत आली होती.
मी मुद्दाम म्हणालो, “मला आज खिचडी खायची इच्छा झाली आहे. अमृताची आई छान खिचडी बनवते.”
गप्पा सुरूच होत्या तितक्यात खिचडी आणि भजे मांडलेले ताट समोर आलेच. घरच्यांनीही ही संधी म्हणून दोन ताटे बनवून आणली. नागनाथला आता पर्याय उरला नाही. ताटातील पहिल्यांदा वाढलेले तेवढे कसेबसे संपवून त्याने हात धुतले. घरच्यांच्या चेहऱ्यावर आता कुठे समाधान दिसत होते.
आईबाबांचे नेहमीचे संवाद ऐकून मागे एकदा अनुज म्हणाला होता, “बाबा तुम्हाला जेवायला वेळ मिळते का?” मोठ्या माणसांचा हेल काढून ह्या छोट्याशा जीवाने विचारलेला प्रश्न ऐकून कौतुक वाटले होतेच, सोबत खूप हसायलाही आले होते. ती आठवण काढून आम्ही परत एकदा वातावरण हलकेफुलके केले. मग सगळ्यांचा निरोप घेतला.
या प्रश्नावर तोडगा कसा काढायचा, लोकांना याबद्दल जाणते कसे करायचे याचा विचार करत रात्री एक-दोन वाजता कधीतरी झोप लागली.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुले आनंदशाळेत आली.
अमृता-अनुजही आले. आता त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद दिसत होता.
दिनक्रमातील गोष्टी बाजूला ठेवून सगळ्या मुलांना घरी परत पाठवले आणि जे बियाणे, धान्य असेल ते एक मूठ घेऊन यायला सांगितले.
मूठभर डाळ आणि दोन मुठी तांदूळ म्हटले की ‘शिवारफेरी’ असे गणित मुलांच्या डोक्यात पक्के होते.
“सर… परत शिवारफेरी करायची का?” एकदम तीन-चार मुलांचा प्रश्न.
“नाही! शिवारफेरी नाही, आज आपण शेतीचे गणित नीट समजून घेऊ!”
“प्रत्येकाने एक मूठ धान्य आणि सोबत एक रिकामी वाटी आणायची आहे.”
मुले उत्सुकतेने घराकडे धावली. अगदी पाच-दहा मिनिटांतच सगळी मुले परत आली. रात्रीची चर्चा ऐकल्यामुळे अमृता-अनुज यांना अंदाज आला; पण इतर मुले काहीतरी नवीन सांगणार म्हणून उत्सुकतेनी पाहू लागली.
खूप तत्त्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत न पडता मी लगेच कृती करण्यास सांगितले.
“तुम्ही जे बियाणे आणले आहे त्यातील शंभर दाणे मोजून सोबतच्या वाटीत वेगळे काढायचे आहेत.”
सगळ्यांनी मोजायला सुरुवात केली.
वेगळेपणा दाखवण्यासाठी महादू नेमके तीळ घेऊन आला होता.
“अरे, मला माहिती असतं तर हरभरे आणले असते. मोजायला सोपं झालं असतं.” त्यानेच त्याचे निरीक्षण नोंदवत सांगितले.
थोड्याच वेळात सगळ्यांनी मोजणी पूर्ण केली.
मी पाण्याची बाटली देत सांगितले, “वाटीतील बिया बुडून पाणी थोडंसं वर येईल इतकं पाणी वाटीत ओतायचं आहे.”
“सर, या बियांना मोड आणून उसळ करायची का?” प्रथमेशचा प्रश्न.
मी फक्त नकारात्मक मान हलवून पुढील सूचना दिली, “प्रत्येकानं रद्दीपेपरांमधलं एक पान घ्यायचं आहे. त्यावर वरच्या बाजूला आपलं नाव लिहून वाटी त्या पेपरावर ठेवून द्या.”
प्रथमेशच्या डोक्यातली उसळ काही जात नव्हती. हा पेपर म्हणजे उसळ खाण्यासाठी वापरायचा कागद आहे असे त्याला वाटत होते. मोठ्या कार्यक्रमात असा रद्दीच्या पेपरावरच चिवडा दिला जातो.
दुसऱ्या दिवशीपर्यंत मुलांची उत्सुकता ताणलेली होती. मीही काहीच उलगडून न सांगता पुढील कृती सांगितली.
“तुमचं नाव लिहिलेल्या कागदावर, एकेक इंच जागा सोडून उभ्या-आडव्या रेषा काढून शंभर चौकोन आखून घ्या.”
पट्टी पेन्सिल घेऊन सगळे मन लावून कृती करू लागले.
आपण नेमके काय करतोय याबद्दल सगळ्यांच्या डोक्यात वेगवेगळे तर्क होते.
आखून झाल्यावर मुलांना त्यांच्या वाटीमधले बियाणे प्रत्येक कप्प्यात एक ह्याप्रमाणे काटेकोरपणे ठेवण्यास सांगितले.
मुले एकाग्र होऊन बिया ठेवत होती.
कालच्या मोजमापाची ही परत तपासणी होती.
काहींचे बियाणे शंभर रकान्यात ठेवण्यास अपुरे पडले, तर कोणाकडे एक-दोन जास्ती निघाले.
मोजमापात झालेली गडबड त्यांच्या लक्षात आली.
सगळ्यांचे बियाणे ठेवून झाल्यावर, बियाणे सांडणार नाहीत अशी कागदाची घडी घालण्यास सांगितले. त्यावर वाटीमधले उरलेले पाणी टाकायला सांगितले. मुलांनी दुसऱ्या एका चिठ्ठीवर आपले नाव व बियाण्याचे नाव लिहून आपल्या पुडीशेजारी ठेवले. आपल्याला इतक्या लवकर काही याचे गुपित कळणार नाही हे आता मुलांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी सर्व सूचना बारकाईने पाळत सांगितले तेवढी कृती केली. पुढील चार दिवस याबद्दल काहीच न बोलता, फक्त कागद ओला आहे न हे पाहणे, त्यावर थोडे पाणी शिंपडणे हे काम मी त्यांना सांगितले.
पाचव्या दिवशी मात्र सर्वांना आपापल्या बियांची गुंडाळी घेऊन बसण्यास सांगितले.
“मुलानो, आता ही गुंडाळी अलगद उघडायची आहे. सोबत नोंदी करण्यासाठी एक वही घ्या.”
मुलांनी वहीमध्येपण पेपरावर आखले होते तसे रकाने आखून घेतले.
“ज्या रकान्यातील बियाणं रुजलं आहे, तिथे एक रोपाचं चित्र काढायचं, अंकुर दाखवयाचे. जिथलं बियाणं रुजलं नाही तिथे मात्र फक्त बी चं चित्र काढायचं.”
तासभर मोजमाप आणि नोंदी झाल्यावर सगळे एकत्र बसलो. कोणाच्या कागदावर हिरवे अंकुर जास्त होते, तर कोणाकडे काही बिया तशाच राहिल्या होत्या. मुलांच्या डोळ्यांत निर्मितीचा आनंद दिसत होता.
“तर मुलांनो, आपण हे जे काही केलं, तो आहे ‘बियाणे उगवण-क्षमता अभ्यास’!”
“अरे सर, खरंच मजा आली!” महादूने आपले मत नोंदवले.
“आता समजलं, पेरण्याआधी बियाणं का तपासावं लागतं,” अमृता मनापासून म्हणाली.
कपिलने त्याची शंका विचारली, “सर, बाजारातून आणलेल्या बियाण्याचंपण असं करायचं का?”
“हो! बाजारातून आणलेल्या बियाण्यांची तपासणी करणं तर अगदी गरजेचं असतं,” मी ठासून सांगितलं.
अमृता म्हणाली, “सर, बियाणं आधी तपासून मग पेरायचं, म्हणजे वेळ आणि पैसे दोन्ही वाया जाणार नाहीत!” तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद दिसत होता.
“मी घरी जाऊन परत एकदा हे करून बघणार आहे,” अनुज हसत म्हणाला.
“मुलांनो, बियाणं उगवलं नाही, तर कंपनीकडे तक्रार करता येते, बियाण्यासाठी दिलेले पैसे परत मिळतात,” मी सांगितलं.
आता सगळ्यांनाच ही गोष्ट आपल्या घरी सांगायची उत्सुकता होती. गेले पंधरा दिवस न उगवलेल्या सोयाबीनचीच गावभर चर्चा होती. मुलांना विषयाचे गांभीर्य कळले, महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तरही मिळाले.
सगळी मुले उत्साहाने घरी निघाली. मी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभा राहिलो.
मनात समाधान होते. थोडासा उशीर झाला, तरी हा उपक्रम मुलांसोबत करून पाहणे आनंददायी होते. मुले प्रत्यक्ष करून शिकली; फक्त अंक नाही, तर यातून एक अनुभव आणि त्यांच्या घरातील प्रश्नावर उत्तरही घेऊन गेली.
बसवंत विठाबाई बाबाराव

गेली पंधरा वर्षे शाळेमधील पर्यावरण शिक्षण विषयात कार्यरत. पुण्यातील वनराई संस्थेच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक.
