स्वप्नील देशपांडे

पालकनीतीमधील उत्तरा जाधव यांचा ‘अर्थ आणि अनर्थ’ (https://palakneeti.in/artha-ani-anartha/) हा लेख वाचला. संदर्भ म्हणून त्या आधीचा ‘इंद्रधनुष्याची वाट’ (https://palakneeti.in/indradhanushyachee-vaat/) हा लेखही वाचला. त्यांचा प्रवास आणि बदल घडविण्यासाठी सुरू असलेले त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पाहून खूप कौतुक वाटले. पण त्याचवेळी, लिंगभाव आणि लैंगिकतेसारख्या संकल्पनांशी जोडलेल्या अनेक शब्दांची, संकल्पनांची, वर्तणुकीची खूपच सोपी, काहीशी बंदिस्त आणि वैद्यकीय अंगाने जास्त अशी व्याख्या केली गेली आहे असे वाटले. त्याचा हेतू वाचकांना या संकल्पना सहजतेने समजाव्यात असा असेलही, पण या संकल्पनांबद्दल वाचकांना थोडी अजून माहिती मिळावी, वेगवेगळे दृष्टिकोन मिळावेत आणि मुख्य म्हणजे अजून काही अत्यंत मूलभूत अशा गोष्टी समजाव्यात या प्रामाणिक हेतूने त्या लेखाला हा प्रतिसाद लिहीत आहे.

ओळख म्हणजे स्वतःला स्वतःबद्दल असलेली जाणीव. एकाच वेळी अनेक ओळखीही असू शकतात, आणि त्या वेळेनुसार, स्थळानुसार बदलूही शकतात. जात, धर्म, भाषा, देश, भौगोलिक प्रदेश या व अशा अनेक ओळखी समाजाने दिल्यानंतरही, कुठलीही व्यक्ती ती ओळख स्वीकारू शकते, त्यापासून स्वतःला दूर करू शकते, किंवा ती ओळख पूर्णपणे बदलू शकते. हे जसे आहे तशीच लिंगभाव आणि लैंगिकतेबाबत व्यक्ती स्वतःच स्वतःची ओळख ठरवू शकते. कुठलीही ओळख असण्यासाठी ठरावीक लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता असावी असा कुठलाही नियम नाही; त्यासाठी स्वतःला असलेली जाणीव पुरेशी आहे.

लेखात केलेल्या व्याख्या खूप बंदिस्त श्रेणींमध्ये केल्या गेल्या आहेत. कुठल्याच श्रेणीत न बांधली जाणारी ओळख असलेल्या व्यक्ती या व्याख्यांमध्ये बसतीलच असे नाही. लेखात आलेल्या काही व्याख्यांद्वारे आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. 

‘इंटरसेक्स’ ची व्याख्या ‘क्वचित एखाद्या व्यक्तीमध्ये स्त्री आणि पुरुष असे दोघांचेही काही प्रजनन-अवयव विकसित झालेले दिसतात. तिला इंग्रजीत इंटरसेक्स (Intersex) आणि मराठीत द्विलिंगी म्हणतात’ अशी केलेली आहे. खरे तर, अनेकदा, प्रमाण मानल्या गेलेल्या स्त्री किंवा पुरुष अशा दोन्हीसारखे त्या व्यक्तीचे शारीरिक लिंग नसते, किंवा इतर कुठल्याही प्रकारची नैसर्गिक विविधता त्यात असू शकते. शिवाय, फक्त लिंग नाही, तर संप्रेरके किंवा गुणसूत्रांमुळेही एखाद्या व्यक्तीमध्ये भिन्नता असू शकते, म्हणून प्रत्येक वेळी शारीरिक लिंगात विविधता असेलच, असेही नाही. मुख्य म्हणजे, इंटरसेक्स असलेली व्यक्ती स्वतःला स्त्री, पुरुष, ट्रान्सजेन्डर किंवा अजूनही काही मानत असेल, तर तो अधिकार पूर्णपणे त्या व्यक्तीचा आहे; कुठलीही शस्त्रक्रिया, प्रमाणपत्र वा कुणाच्याही दुजोऱ्याशिवाय.

बायसेक्शुअलच्या दोन्ही व्याख्यांमध्ये देखील ‘व्यक्तीचे लिंग स्त्री व लिंगभाव स्त्रीचा’ किंवा ‘लिंग पुरुषाचे व लिंगभाव पुरुषाचा असतो’ असे गृहीत धरलेले आहे. पण अशी कुठलीही व्यक्ती, जिचे शारीरिक लिंग किंवा लिंगभाव काहीही असला (उदाहरणार्थ ट्रान्सजेन्डर, जेन्डर क्वीअर किंवा जेन्डर नॉन बायनरी) आणि तिला दोन वेगळ्या लिंगभाव असलेल्या व्यक्तींबद्दल आकर्षण वाटत असेल, तरीही ती व्यक्ती बायसेक्शुअल असू शकते. तसेच असेक्शुअल या व्याख्येतही ‘लिंग पुरुषाचे किंवा स्त्रीचे असते’ असे गृहीतक आहे. असे असेलच, असे नाही. शारीरिक लिंगात विविधता, आणि कुणाबद्दलाही लैंगिक आकर्षण न वाटणे हेसुद्धा असू शकते. ‘लेस्बियन’ आणि ‘गे’ ह्या व्याख्याही अपूर्ण वाटतात, कारण ‘लिंग स्त्रीचे, लिंगभाव स्त्रीचा, आकर्षण फक्त स्त्रीबद्दल’ व ‘लिंग पुरुषाचे, लिंगभाव पुरुषाचा, आकर्षण फक्त पुरुषाबद्दल’, हेदेखील सरसकट नियमासारखे लागू होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, एखादी स्त्री स्वतःला लेस्बियन म्हणत असेल, पण तिला कधीतरी एखाद्या पुरुषाबद्दल आकर्षण वाटले, म्हणून लगेच तिची ओळख बायसेक्शुअल होत नाही. ती व्यक्ती स्वतःला जे समजते, तीच त्या व्यक्तीची ओळख असते.

थोडक्यात काय, तर वर्तनावरूनच, किंवा फक्त काय वाटतंय, यावरूनच लैंगिक ओळख ठरेल, असे नाही. अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या ओळखीमध्ये आणि वर्तनामध्ये वेगळेपण दिसू शकते. त्याला अनेक सामाजिक कारणे असू शकतात, किंवा ती फक्त त्या व्यक्तीची निवडही असू शकते. सहसा याला सामाजिक दबाव, कौटुंबिक कारणे, पितृसत्ताक कायदे अशी अनेक कारणे असू शकतात. अशा वेळीही त्या व्यक्तीच्या वर्तनातून किंवा नात्यांवरून तिची ओळख समजून घेण्याच्या ऐवजी, ती व्यक्ती स्वतःची जी ओळख सांगेल, त्याचाच आदर करावा.

लेखात म्हटल्याप्रमाणे, स्वतःच्या ओळखीविषयी गोंधळात असणाऱ्या व्यक्ती स्वतःला ‘क्वीअर’ म्हणतीलच, असे नाही. आपण क्वीअर या शब्दाचाही मूळ अर्थ समजून घेऊ. LGBTQIA+ समाजासाठी एकत्रितपणे हा शब्द वापरला जात असला, तरी त्याचा मूळ अर्थ ‘वेगळेपण’ असा आहे. म्हणूनच तो शब्दही अंगीकारला गेला. आपल्या सामाजिक संदर्भात काही जातींबाबत ‘दलित’ हा शब्द जसा वापरला जातो (आणि आता हा शब्द त्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे), त्याचप्रमाणे क्वीअर हा शब्दही वापरला जातो. लिंग कुठल्या साच्यात बसणारे आहे, कुणाबद्दल लैंगिक आकर्षण वाटते, लिंगभाव काय आहे, या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विषमलैंगिक चौकटीला प्रश्न विचारणारे लोकही स्वतःला क्वीअर म्हणवून घेऊ शकतात.

या उदाहरणांवरून आतापर्यंत काही प्रमाणात का होईना, हे स्पष्ट झाले असेल, की प्रत्येक ओळख ही लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता, अशा तराजूच्या काट्यावर तोलून मग ठरवता येत नाही. त्याच्या व्याख्या करणे तर अजूनच अवघड. आपल्या भावनांचा आपल्या मनात एक अवकाश असतो. प्रत्येक भावनेला एका चौकटीमध्ये किंवा व्याख्येमध्ये बसवता येत नाही आणि आपली त्याबद्दलची समज सारखी बदलत असते. त्याचप्रमाणे या संकल्पनांचा आणि ओळखीचाही एक अवकाश आहे, त्यांनाही अनेक पैलू आहेत. त्यांना कुठल्याही चौकटीत, व्याख्येमध्ये आणि स्थायी स्थितीत ठेवता येणे शक्य नाही.

शेवटाकडे येताना मूळ मुद्दा पुन्हा अधोरेखित करणे गरजेचे आहे, की कुणाचीही ओळख ही लिंग, लिंगभाव आणि लैंगिकता यातल्या ठरावीक आणि कठोर संयोगाने न ठरता त्या व्यक्तीच्या स्वतःच्या जाणिवेने ठरते. LGBTQIA+ हेदेखील कुठले कठोर वर्ग किंवा श्रेणी नसून, संदर्भ आणि सापेक्षतेप्रमाणे सतत विकसित होत जाणाऱ्या संकल्पना आहेत. या संकल्पनांचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करणे स्वागतार्हच; पण त्यांना बंदिस्त व्याख्यांमध्ये, त्यातही मुख्यत्वे शारीरिक लिंग, गुणसूत्र, शस्त्रक्रिया यावर आधारित श्रेणींमध्ये टाकणे, हे टाळलेलेच बरे. कुठल्याही व्यक्तीचे ओळखपत्र, कपडे, अनुभव, वर्तन किंवा इतर कुठल्याही घटकांवरून त्यांची ओळख गृहीत धरण्यापेक्षा ती व्यक्ती सांगेल त्या ओळखीचा स्वीकार आणि आदर करावा. उत्तरा जाधव यांनीही त्या लेखाच्या उत्तरार्धात अशाच प्रकारचा संदेश दिलेला आहे; तो खूप महत्त्वपूर्ण आहे. कुठल्याही व्यक्तीची सामाजिक पार्श्वभूमी, जसे की जात, धर्म, आर्थिक परिस्थिती, भाषा, वय, आणि अशा अनेक गोष्टी न पाहता जसे आपण सगळ्यांशी आदराने वागण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे या संकल्पनांचा अर्थ समजायला थोडा वेळ लागला, तरी प्रत्येक व्यक्तीशी आपण आदराने वागतोय की नाही, हे तपासणे हाच आपला प्रयत्न असायला हवा. 

कधीही न संपणाऱ्या या शिक्षणाच्या प्रवासासाठी आपल्या सगळ्यांना (अर्थातच मलाही) मनःपूर्वक सदिच्छा!

स्वप्नील देशपांडे

swapneel.ad@gmail.com

स्त्रीवादी सामाजिक कार्यामध्ये पदव्युत्तर पदवी. सध्या प्रयास आरोग्य गट, पुणे येथे कार्यरत आहेत. 

प्रयास आरोग्य गट गेली अनेक वर्षे लैंगिकता व त्याच्याशी संबंधित अनेक विषयांवर संशोधन व प्रत्यक्ष काम करत आहे. ‘प्रयास’चे सध्या महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये सर्वंकष लैंगिकता शिक्षणाची सत्रे घेणे, त्याचबरोबर विविध संस्थांसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सर्वंकष लैंगिकता शिक्षणावर आधारित ‘सहज’ (सन्मान, हक्क, जबाबदारी) एज्युकेटर्स फेलोशिप’ राबवणे, हे व असे अनेक प्रकल्प सुरू आहेत.