डॉ . अनुजा कुलकर्णी
एक अनुभव, एक प्रश्न
परवा एका शाळेमध्ये मला पूर्वपौगंडावस्थेतील मुलांच्या पालकांसाठी सत्र घ्यायला बोलावले होते. शिस्त, स्क्रीन, मोबाईलचा वापर, अभ्यास, भावनिक संतुलन अशा काही कळीच्या मुद्यांवर बोलणे झाले. त्यानंतर आजच्या, आणि त्याहूनही महत्त्वाच्या उद्याच्या, काळातील ‘लिंगभाव समानता आणि पालक म्हणून त्यासंदर्भातील आपली भूमिका’ या विषयावर संवाद सुरू झाला. मुलगा असून रडतोस का? घरातली कामे मुलीलाच का सांगायची?… अशा विविध प्रश्नांवर मोकळी चर्चा होत होती.
एका आईने अनुभव सांगण्यासाठी हात वर केला –
“मागच्या वर्षी पाचवीत असताना माझा मुलगा आदित्य या शाळेत आला. त्याआधी आम्ही दुसऱ्या शहरात राहत होतो. नवीन शाळेचा त्याचा पहिलाच आठवडा होता. नुकताच तो आमच्या एका नातेवाईकांकडे जाऊन आला होता. त्याचे २-३ मित्र-मैत्रिणी शेजारच्या घरात मेंदी काढत होते. आदित्यनेही हातावर मासे, गाड्या, डोंगर अशी आवडीची चित्रे काढून घेतली. सगळी मुले-मुली खूश होती. दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर मात्र तो शांत आणि उदास होता. पुढचे दोन दिवस तो घरीही रडत होता. बरेच विचारल्यानंतर त्याने सांगितले, की शाळेतल्या शिक्षकांनी त्याला रागावले. ‘मेंदी काढून शाळेत आलेले चालत नाही. नियम मोडलास तर मोडलास, पण मुलींसारखी मेंदी काय काढतोस? मुलगा आहेस ना तू? पुन्हा असे करू नकोस’… वगैरे. एक वेळ शिक्षकाने रागावणे वेगळे, पण त्यानंतर काही मुलांनीही त्याला चिडवायला सुरुवात केली. शाळा आवडणारा माझा मुलगा अचानक शाळेत जायचे नाही म्हणू लागला. त्यानंतर काही दिवसांनी त्याने विचारले, ‘आई, मला बाबांसारखी मिशी काढता येईल का?’ मी विचारात पडले. शेवटी मी शाळेत जाऊन समुपदेशकांच्या मदतीने ही परिस्थिती हाताळली.”
त्या दिवशी आदित्यच्या आईच्या डोळ्यांमधली असहायता मला आतून हलवून गेली. या प्रसंगाने मला पुन्हा एकदा जाणवले, की लिंगभावाच्या रूढ कल्पना आपल्या समाजात किती खोलवर रुजलेल्या आहेत. आणि त्या बदलायच्या असतील तर किती सजगपणे प्रयत्न करावे लागतील. हे केवळ एका आदित्यचे नाही, कित्येक घरांमधले वास्तव आहे.
पिढ्यांमधील बदल : एक दृष्टिक्षेप
देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आसपासच्या काळात घरोघरी लैंगिक भूमिका अत्यंत ठाम होत्या. मुलग्यांना बाहेरच्या जगासाठी – कमावणे, निर्णय घेणे – तयार केले जाई. मुली मात्र लहानपणापासूनच स्वयंपाकघर, सेवा आणि मुक्याचे व्रत यांच्याशी जोडल्या जात. ‘हे असेच का?’ असे कुणी विचारत नसे, कारण हे असेच होते. हे संस्कार आईवडील शब्दांतून नाही, तर घरातील रोजच्या दिनचर्येतून पुढे देत असत.
१९६० ते १९८०च्या दशकात मुली शाळेत जाऊ लागल्या, काही घरांमध्ये त्यांना महाविद्यालयात जाणेही शक्य झाले; पण दुजाभाव कायम राहिला. मुलांना घरकामातून सूट होतीच. मुलींनी समंजस आणि मृदुभाषी असावे, तर मुलांचे धाडस कौतुकाचे मानले जाई. घराबाहेर काम करणारी आई गरजेपोटी काम करते असे समजले जाई; आणि तरीही घराची सारी जबाबदारी तिचीच. काळजीच्या भाषेत नियंत्रणाची भाषा दडलेली होती. मात्र बहुतेक पालकांना हा फरक जाणवतही नव्हता.
मिलेनियल पिढीने जागरूकता आणली, पण बदल अपुरा राहिला. ‘माझी मुलगी कुठलेही काम करू शकते’ असे सांगणारे पालक मुलाला मात्र स्वयंपाक शिकवायला विसरत. मुलींवर करिअर आणि घर असा दोन्हींचा भार लादला गेला. बाबा घरात ‘मदत’ करू लागले; पण ‘मदत’ हा शब्दच सांगतो की घरकामाची जबाबदारी आईचीच आहे असे गृहीत होते. संमिश्र संदेश घेऊन मुले वाढली – धाडसी व्हा, पण फार नाही; स्वतंत्र व्हा, पण जबाबदाऱ्या विसरू नका… इत्यादी.
संशोधन काय सांगते?
केरळमधील कोझिकोड जिल्ह्यात ४ ते ८ वर्षे वयाच्या मुलांवर एक अभ्यास केला गेला. इतक्या लहान वयातही व्यवसाय, खेळ, कपडे, जबाबदाऱ्या यांबद्दल मुलांचे ठाम लैंगिक समज असतात. हे संस्कार घरातूनच येतात.
आयेशा शुमिअर (२०२१) यांनी भारतातील ११४ पालक आणि मुलांचा अभ्यास केला. त्यातूनही हे स्पष्ट झाले आहे, की पालकांचा लैंगिक भूमिकांबद्दलचा दृष्टिकोन मुलांवर थेट परिणाम करतो. थोडक्यात, घरात जे दिसते, ते मुलाच्या मनात रुजते.
संवादाच्या पलीकडे जाऊन पालक म्हणून काय करता येईल?
या बाबतीत आजही जाणीवपूर्वक संवाद पुरेसे होत नाहीत. स्त्रीने नोकरी केली तरी घरची, मुलांची जबाबदारी कुणाची हे आजची सासू सहज बोलून मोकळी होते. आजही कित्येक ‘ती’ला स्वयंपाकघरावरचा आपला ताबा सोडणे अवघड जाते.
जेन झी आणि अल्फा ह्यांच्यासाठी हे प्रश्न आता केवळ घरापुरते राहिलेले नाहीत; ते नेतृत्व, करिअरची निवड, आत्मसन्मान यापर्यंत पोहोचले आहेत. सुरक्षिततेच्या नावाखाली मुलींवर घातल्या जाणाऱ्या मर्यादा आणि ‘बळकटपणाच्या’ नावाखाली मुलांवर लादले जाणारे भावनिक मौन या दोन्ही गोष्टी त्यांच्या मानसिक विकासावर खोल परिणाम करतात.
रोजच्या जगण्यातील लैंगिक समानता
लैंगिक समानता हे काही केवळ धोरण, कायदा किंवा शाळेतील अभ्यासक्रम नाही. ही समानता आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असते, आणि ही पद्धत आपल्याला कळत नकळत मिळालेली असते. आपण जे गृहीत धरतो, ज्याबद्दल प्रश्न विचारत नाही, जे आपल्याला साहजिक वाटते – त्यातच धारणा (कंडिशनिंग) दडलेल्या असतात. मुले ते कंडिशनिंग आपल्या नकळत उचलतात.
१. भावना व्यक्त करणे ही आपण दिलेली परवानगी नाही; मोकळीक आणि दिलासा आहे
मुलाला आपण लहानपणापासून सहन करायला शिकवतो. तक्रार करू नकोस, कठीण हो असे सांगत राहतो. मुलीला समजूतदारपणा शिकवतो. रुसू नकोस, दुसऱ्यावर आपला भार टाकू नकोस असा उपदेश करतो. अशा प्रकारे दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारे भावना दाबायला शिकवतो. परिणाम काय होतो? मोठे झाल्यावर मुलाला रागाशिवाय इतर कुठलीही भावना व्यक्त करणे जड जाते. मुलीला स्वतःच्या गरजा मोकळेपणी सांगणे अवघड वाटते. हे दोन्ही कंडिशनिंगचेच दोन वेगळे चेहरे आहेत.
२. ‘काळजी’ आणि ‘नियंत्रण’ यातील फरक ओळखा
मुलीला पालक रात्री एकटे जाऊ देत नाहीत. त्यामागे वाटणारी काळजी असते, हे खरे; पण मुलाला हा प्रश्न कधीच विचारला जात नाही. हे कंडिशनिंग आहे. जग धोकादायक आहे हे सत्य आहे, पण ते फक्त मुलींसाठी धोकादायक नाही. तरीही मुलींना ‘सावध राहायला’ शिकवले जाते आणि मुलांना ‘सामर्थ्यवान व्हायला’! यातून मुलगी शिकते – माझे शरीर ही एक जबाबदारी आहे. मुलगा शिकतो – माझी ताकद हाच माझा मार्ग आहे. दोन्ही विचार त्यांच्या क्षमतांना मर्यादा घालतात.
३. मुलांसमोर आपण एकमेकांशी कसे वागतो हे सर्वात मोठे पाठ्यपुस्तक आहे
आई थकलेली असताना किंवा सहजही ‘आज मी स्वयंपाक करतो’ असे बाबा स्वतःहून म्हणतात का? एखादी गोष्ट बाबांना जड वाटते. अशा वेळी आई ‘तुम्हाला नाही जमणार’ असे म्हणते का? मुले अशा प्रसंगांकडे बघत असतात. त्यातून ती नाते म्हणजे काय, आदर म्हणजे काय, जबाबदारी म्हणजे काय हे शिकतात. असे प्रसंगांतून मिळणारे शिक्षण कुठलेही पुस्तक, कुठलीही शाळा देऊ शकत नाही.
थांबा… विचार करा!
लैंगिक समानता ही घोषणा नाही, एक सवय आहे. रोज घडवायची, रोज तपासायची! आदित्यच्या मनावर उमटलेला प्रश्न पुसला गेलेला नाही. हा प्रश्न विचारणारा आदित्य प्रत्येक घरात आहे – कधी मुलाच्या रूपात, तर कधी मुलीच्या रूपात. तो आपल्याकडे बघतो आहे. अशा वेळी आपण काय दाखवतो ते त्याचे उत्तर बनते. पालक म्हणून आपल्याला परिपूर्ण असण्याची नाही; पण जागरूक असण्याची गरज नक्की आहे.
मी इथे तीन प्रसंगांच्या माध्यमांतून तीन प्रश्न उपस्थित करणार आहे.
प्रसंग १
तुमच्या घरात आई आजारी आहे. त्या दिवशी घराची व्यवस्था कशी होते? बाबा सहजच सगळे सांभाळतात, की ‘आता काय करायचे?’ हा प्रश्नच घरभर तरंगत राहतो? मुले हे बघत असतात.
बाबा थकून घरी आले आणि म्हणाले ‘आज डोके जड आहे, जरा आराम करतो’.
आई थकून घरी आली, तर ती हेच म्हणू शकते का? की ती आल्याआल्या स्वयंपाकघरात जाते?
ही दोन्ही दृश्ये मुले पाहतात. त्यातून थकणे कुणाला परवडते ते ठरवतात.
प्रसंग २
तुमची मुलगी रात्री मैत्रिणींबरोबर बाहेर जाणार आहे. तुम्ही तिला काय विचारता? ‘कुठे जातेस, कधी येशील?’ की ‘तू मुलगी आहेस, जाऊ नकोस.’ या दोन वाक्यांमधला फरक वाटतो लहान, पण मुलीसाठी तो खूप मोठा असतो.
प्रसंग ३
घरात एखादा महत्त्वाचा आर्थिक निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी आईचे मत विचारले जाते का? विचारले तर ते खरोखर ऐकले जाते का? की नंतर त्याचे ‘मी बघतो काय करायचे ते’ असे होते?
या प्रश्नांची उत्तरे कुणी कुणाला द्यायची नाही आहेत.
ती फक्त स्वतःशी ताडून बघायची आहेत.
कारण बदल कधी बाहेरून येत नाही,
तो आधी आपल्या विचारांमध्ये होतो,
मग बोलण्यात येतो, आणि मग घरात दिसतो.
आणि घरात जे दिसते ते पुढच्या पिढीत उतरते!!
डॉ . अनुजा कुलकर्णी

anujadk@gmail.com
मानसशास्त्रज्ञ. गेली १४ वर्षे समुपदेशक म्हणून काम करतात. वैयक्तिक, कौटुंबिक तसेच कामाच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व संतुलित दृष्टिकोन मिळवण्यासाठी विद्यार्थी, पालक तसेच व्यावसायिकांना मार्गदर्शन करतात.
