पालकनीती परिवारच्या खेळघर या प्रकल्पामध्ये मुलांच्या परीक्षा झाल्यावर १५ दिवस “कला” या विषयावर काम करणार आहेत. त्या संदर्भात १४ एप्रिलला, एक दिवसाचं सत्र घेतलं गेलं. ते रणजित कोकाटे या आर्टिस्टनी घेतलं. बंगलोरच्या आर्ट्स स्पार्क या संस्थेने विकसित केलेल्या कला शिक्षणाच्या पद्धतीवर आधारित ही सत्र आखले होते. खेळघरात येणार्या मुलांसाठी वर्ग घेणार्या ताया आणि त्यांना मदत करणारे काही volunteers सत्रात सहभागी झाले होते. माझा अशा प्रकारच्या वर्कशॉपचा हा पहिलाच अनुभव होता. अनेक गोष्टी पहिल्यांदाच केल्या, अनेक गोष्टी नव्याने कळल्या. रेषा आणि पोत यांचे प्रयोग करताना कुठल्याही प्रकारची चौकट पाळायची नव्हती किंवा “अमुक एका वस्तूचे / प्रकारचे चित्र तयार करायचे आहे” असे बंधनही नव्हते, सर्व काही “करून बघू” या प्रकारात मोडणारे असल्यामुळे प्रयोग करायला मोकळेपणा वाटला. काही प्रयोगांचे रिझल्ट आवडले, काहींचे नाही आवडले. काही रेषा किंवा पोत अपेक्षेप्रमाणे दिसत नव्हते. पण एकूणात अनुभव खूप छान होता. “स्वातंत्र्य” हा विषय तसा खोल. पण तरीही थोड्या कालावधीत त्यावर चर्चा करून जाणवणारे मुद्दे नोंदवताना बर्याच गोष्टी मांडायचा प्रयत्न करता आला. त्या मुद्द्यांची प्रतिकं कोणती हा विचार करताना थोडा गोंधळ उडाला. कितीही प्रयत्न केला तरी त्यात कुठेतरी साचेबद्धपणा येतो आहे असं वाटत होतं. म्हणजे “स्वातंत्र्य” म्हणलं की उघडलेलं कुलूप, आकाश, अशीच प्रतिकं डोळ्यासमोर येत होती. पण वेगळी काही प्रतिकं – ज्यांचा संदर्भ स्वातंत्र्याशी जोडता येईल अशी – सुचतही नव्हती. कदाचित अजून जास्त विचार आणि वेळ त्यासाठी दिला तर सुचतीलही. मग सुचलेल्या प्रतिकांची रचना करून चित्र तयार करताना आमच्या पैकी प्रत्येकांनी अगदी वेगळा आणि स्वतंत्र विचार केला होता हे खूप छान वाटलं. आधी शिकलेल्या तंत्रांचा नीटसा उपयोग मी माझ्या रचनेत केला नाही, तो अजून चांगल्याप्रकारे करू शकले असते. पण “स्वातंत्र्य” या विषयाचा एक छोटासा पैलू चित्रातून मांडण्याचा प्रयत्न मी केला, पहिल्यांदाच! एकंदरीत “चित्रातून व्यक्त होणे” या प्रक्रियेशी माझी ओळख झाली, त्या प्रक्रियेमधला आनंद मी अनुभवला आणि अशा प्रकारचा अनुभव आपण पुन्हा पुन्हा घ्यावा ही इच्छा मनात नक्कीच निर्माण झाली. “मी चित्रातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करू शकते” याचा आत्मविश्वास आला हा सगळ्यात मोठा फायदा!!
आदिती करंदीकर

