विक्रांत पाटील  

लहान मूल जन्माला येतं तेव्हा त्याला स्वतःचं वेगळं ‘मी’पण नसतं. बाळाला शारीरिक सीमारेषा, मानसिक मर्यादा कळत नाहीत. ‘मी’ आणि ‘जग’ त्याला एकच वाटतं. अर्थात, ही समज फार दिवस टिकत नाही. अगदी थोड्या दिवसांत चित्र बदलतं. आपला हात किंवा पाय आपल्या इच्छेनं हलतो हे बाळाला कळायला लागतं. शरीराचा कोणता भाग स्वतःच्या इच्छेनं वापरता येतो याचा खेळ (खरं तर सराव) चालतो. एकदा ते कळलं, की जग वेगळं आणि मी वेगळा ही समज पक्की होते. म्हणजे माझ्या शरीराच्या सीमारेषा कुठे संपतात आणि बाहेरचं जग कुठे सुरू होतं ते कळायला लागतं. मग पुढचा सराव (किंवा खेळ!) – स्वतःच्या इच्छेनं बाहेरच्या जगात बदल घडवणं. कधी शक्तीचा प्रयोग करून, कधी घरातल्या मोठ्यांना लाडीगोडी लावून, लहानग्या गोड आवाजात आदेश देऊन आपल्याला काय हवं ते करवून घेण्याचं कसब मूल कमावतं. दोन वर्षांचं होईतो बाळाची खात्रीच होते, की मी म्हणजे जगाचा राजा आणि आईबाबा माझी प्रजा.

मऊ भिंती 

त्यापुढे मात्र आईबाबांसाठी बाळाच्या नव्याचे नऊ दिवस संपतात. आणखी एका बाळासाठी किंवा आयुष्यातल्या इतर महत्त्वाच्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी ऊर्जा देण्याची वेळ आलेली असते. त्यामुळे कालपर्यंत बाळाच्या इच्छेप्रमाणे वागणारे आईबाबा त्याचं ऐकेनासे होतात. हीच ती वेळ जेव्हा बाळाला शारीरिक सीमारेषांच्या पलीकडे जाऊन मानसिक सीमारेषा समजायला सुरुवात होते. मात्र इथे सजग पालकांची जबाबदारी अजून वाढते. मूल मागेल ती प्रत्येक गोष्ट द्यायची नाहीये. सारासार विचार करून योग्य त्याच मागण्या पूर्ण करायच्या ही झाली एक बाजू; पण ज्या मागण्या पूर्ण करायच्या नाहीयेत त्याबद्दल विचार स्पष्ट असावे लागतात. तशी प्रेमळ पण स्पष्ट व दृढ सीमारेषा आखायला लागते.

आईबाबा दिसतील एवढ्या अंतरावर जाऊन मूल नवीन वस्तू हाताळतं. भीती वाटली तर लगेच पालकाकडे धाव घेतं. तिथे त्याला सुरक्षित वाटतं. जरा वेळ त्यांच्या कुशीत घालवला की स्वारी परत दूर जाणार. ठरलेल्या परिघात कुठे जायचं हे मूल निवडेल; पण तिथे काय धोके आहेत हे ऒळखून तो परिघ पालकांनी ठरवणं अपेक्षित आहे. ही लक्ष्मणरेषा एखाद्या मऊ भिंतीसारखी पण भक्कम असावी. म्हणजे मूल त्यावर जाऊन धडकलं तरी इजा होणार नाही; मात्र त्यापलीकडे जाता येणार नाही एवढी भक्कम असावी. आता मऊ पण खूप भिंती घातल्या तर मुलाची वाढच होणार नाही; पालकांपासून सुट्टं होण्यातच वाढ आहे. आणि भिंतीच घातल्या नाहीत तर मुलाच्या जिवाला धोका असू शकतो हा एक भाग आणि मला हवं तसं वागण्याची मुभा आहे असा मुलाचा गैरसमज होण्याची शक्यता हा दुसरा भाग!

या रूपकामध्ये मुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर आहेच; पण पालक म्हणून मुलांना प्रेम द्यायचं असलं, तर पालकांना स्वत्वसुद्धा टिकवायला लागतं. 

मानसिक सीमारेषा म्हणजे नेमकं काय?

माझ्या भावना, विचार, गरजा आणि जबाबदाऱ्या नेमक्या कुठे सुरू होतात आणि दुसऱ्यांच्या कुठे संपतात, हे आपल्या भोवतालच्या लोकांना प्रेमळ पण दृढ शब्दात सांगणं म्हणजे मानसिक सीमारेषा ठरवणं.आणि ही सीमारेषा निरोगी असणं म्हणजे स्वतःचा आदर करणं आणि इतरांनाही तुमचा आदर करायला भाग पाडणं होय. प्रत्येक व्यक्तीची एक मानसिक लक्ष्मणरेषा असते आणि ती आपण ऒलांडून जाऊ नये याची ओळख लहान मुलांना पालकांसोबत सहज होऊ शकते. म्हणजे मूल आपलं असलं, तरी आपल्या मानसिक सीमारेषा ओलांडल्या गेल्यानं आपल्याला त्रास होतो हे त्याला सांगायला हवं. हा स्वतःचा अभ्यास आहे; मुलांचा नव्हे. त्यामुळे आपण आपल्या सीमा योग्य पद्धतीनं हाताळायला शिकलो, की मुलांना पण ते सांगणं सोपं होतं. एक साधं उदाहरण. ‘बाळा, आता शेवटची गोष्ट झाली की मी दिवे बंद करून झोपणार आहे. मला आराम करणं आवश्यक आहे’. आता झोपायची वेळ झाली आहे ह्याबद्दल पालक म्हणून स्पष्टता असली तरच शब्द आणि हावभाव परस्परपूरक असतील आणि त्यापुढे केलेली कृतीसुद्धा! यात कुठेही तफावत असली, तर सीमारेषेची दृढता कमी होते. धाक दाखवून लक्ष्मणरेषा आखायला गेलात, तर मुलाचा आत्मसन्मान कमी होतो. 

मानसिक सीमारेषा फक्त हो / नाही म्हणण्यापुरत्या मर्यादित नसतात. योग्य सीमारेषा खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्त्वाचा पाया आहेत. तुमच्यावर विचार लादण्याचा प्रयत्न होत असला, तरी आपले विचार त्या प्रभावापासून स्वतंत्र ठेवणं, यात सीमारेषांची समज महत्त्वाची ठरते. दुसऱ्यांच्या भावनांची जबाबदारी स्वतःवर न घेणं ही सीमारेषेची चांगली समज आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती विनाकारण तुमच्यावर रागावली असेल, तर त्याचा दोष स्वतःवर न घेता स्वतःला शांत ठेवणं. मात्र तिच्या रागावण्याला खरंच आपलं वागणं कारणीभूत असेल, तर क्षमा मागून त्याची दखल घेणं. तुमची ऊर्जा कुठे खर्च करायची आणि कोणाला किती वेळ द्यायचा, हे ठरवण्याचा अधिकार म्हणजे सीमारेषा. तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे (उदा. समानता, प्रामाणिकपणा, निसर्ग, एखादं काम / कला) हे जपणं म्हणजे सीमारेषा.

स्वतःच्या मानसिक सीमारेषा माहीत असणं ही स्वतःवर प्रेम असण्याची चांगली खूण आहे. ह्या मर्यादांची ओळख करून देऊन पालक मुलांना स्वतःवर प्रेम करायला शिकवतात. तुमच्या जवळच्या व्यक्तींना तुमचं खरं व्यक्तिमत्त्व माहीत नसलं, तर तुम्ही त्यांना तुम्हाला जाणून घेण्याची संधी देत नाही. याचाच अर्थ तुम्हाला त्यांच्याकडून हवं तसं प्रेमपण मिळणार नाही! म्हणजेच सुदृढ नात्यासाठी सीमारेषांची ओळख असणं आवश्यक आहे.

इतरांच्या मानसिक लक्ष्मणरेषा ओलांडू नयेत हे पालकांनी मुलांना सांगणं गरजेचं आहेच; पण त्याचबरोबर स्वतःच्या मानसिक लक्ष्मणरेषा कशा सांभाळाव्यात, त्या इतरांना ओलांडू द्यायच्या नाहीत हे सांगणंही महत्त्वाचं आहे. काही त्रास होत असल्यास त्याबद्दल सांगितलं पाहिजे हे मुलांना स्पष्ट शब्दात सांगायला लागतं. त्यांना काही त्रास होतोय का ह्याची पालकांनीही चौकशी करायला हवी. थोडक्यात, मुलांना त्यांच्या सीमारेषा ठरवायला मदत करायला हवी. लहान मुलांना सीमारेषांबद्दल पालकांशी बोलायची सवय असली, तर लैंगिक शोषण, मारहाण इत्यादी गोष्टी अगदी सुरुवातीलाच किंवा वेळेत ओळखून मुलांवर होणारे मोठे मानसिक आघात टाळता येऊ शकतात.

प्रत्यक्ष उदाहरणं

वैयक्तिक मर्यादा ओळखण्यासाठी केवळ ‘समोरच्याची भावनिक साक्षरता’ पुरेशी नसते. प्रत्येकानं आपापल्या मर्यादा स्पष्टपणे मांडणं हे एक महत्त्वाचं कौशल्य आहे. पालक म्हणून आपण आपल्या सीमारेषा कशा जपतो, हे मुलं पाहत असतात. ती ते आपल्याकडूनच शिकतात. जोडीदाराच्या सीमांचा आदर करणं, त्याच्या शारीरिक-भावनिक गरजा समजून घेणं आणि मुलांनी सांगितलेला त्रास गांभीर्यानं घेणं, यातूनच घरात एक निकोप वातावरण तयार होतं.

अनेकदा आपली क्षमता नसताना किंवा आपल्याला वेळ नसताना केवळ ‘नातेसंबंध बिघडतील’ या असुरक्षिततेपोटी आपण कामाला किंवा भेटीगाठींना नाही म्हणत नाही. स्वतःचे हाल करून काम केल्यानं कामाचा दर्जा खालावतो आणि मनात कायमची कटुता निर्माण होते. हे कमकुवत सीमारेषेचं लक्षण आहे. याउलट ‘माझ्या वतीनं निर्णय घेऊ नकोस’ किंवा ‘मला हे आवडत नाही / जमणार नाही’ असं स्पष्टपणे सांगणारी व्यक्ती अधिक सुदृढ नातं निर्माण करू शकते.

कामाच्या ठिकाणीही हाताखालच्या व्यक्तीला काम शिकवणं ही आपली मदत असली, तरी ते काम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी त्याचीच आहे, हे स्पष्ट करणं म्हणजेच सीमारेषा आखणं होय.

एकतर्फी प्रेमप्रकरणात ही सीमारेषांची अस्पष्टता घातक ठरते. समोरच्याला वाईट वाटेल म्हणून स्पष्ट नकार न दिल्यास ती व्यक्ती अधिक गुंतत जाते आणि शेवटी दोघांनाही मनःस्ताप सहन करावा लागतो. पहिल्याच भेटीत अनोळखी व्यक्तींना खूप वैयक्तिक माहिती देणाऱ्या, कशापुढेही नमतं घेणाऱ्या तसेच नेहमीच कट्टर भूमिका घेणाऱ्या व्यक्तींच्या मानसिक सीमारेषा सुदृढ नसतात. थोडक्यात, सीमारेषा ही भिंत नसून आपल्या स्वत्वाचा आदर करणारी सुरक्षित लक्ष्मणरेषा आहे.

सीमारेषा सुदृढ करण्यासाठी

कितीही सजगपणे पालकपण निभवायचा प्रयत्न केला, तरी मुलांना वाढवताना पालकांकडून चुका होणं अगदीच शक्य असतं. त्यातून पालकांचे पिढीजात दुखरे विचार, आघात, सवयी मुलांकडे नकळत जातात. परंतु, आपल्या रोजच्या व्यवहाराकडे डोळसपणे पाहिलं, तर हे दोष आपण दुरुस्त करू शकतो. सुदृढ सीमारेषा आखणं हा एक निरंतर चालणारा ‘प्रकल्प’ आहे.

यासाठी ‘होच’ आणि ‘नाहीच’ हा एक सोपा खेळ खेळता येतो. कोणत्याही परिस्थितीत मी ‘हे पाळणारच’ आणि ‘हे करणारच नाही’ अशा गोष्टींची यादी तयार करा. यातील ‘च’ म्हणजेच तुमच्या सीमारेषा आहेत. आई-बाबांनी एकमेकांच्या अशा याद्यांवर चर्चा केल्यास परस्परांच्या सीमांचा सन्मान राखणं अधिक सोपं होतं. त्यातून मुलांनाही भविष्यात त्यांच्या जोडीदाराच्या सीमारेषांचा आदर कसा करावा हे कळतं.

बहुतेक वेळा सीमारेषांकडे आपण ‘संघर्ष’ किंवा ‘युद्धा’सारखं पाहतो. पण प्रत्येक वेळी शस्त्र उपसण्यापेक्षा मुत्सद्देगिरीनं आपल्या सीमेची दुसऱ्याला ओळख करून देता येते. गंमत म्हणजे सीमेवरून होणारे वाद नेहमी जवळच्या व्यक्तींसोबतच होतात, कारण तिथेच हितसंबंध एकमेकांना छेदतात. हे नातं सुदृढ ठेवणं आपल्याच हिताचं आहे हे लक्षात घेऊन सीमारेषा प्राधान्यानं ठरवाव्या. त्या ठरवताना सुरुवातीला दोघांनाही थोडा त्रास, क्लेश होईल हे मान्य करायला हवं. वाद नको म्हणून चर्चा टाळू नका; उलट वेळेत आणि गोड शब्दांत आपली भूमिका मांडायला शिकणं हीच खरी सुदृढ नात्याची गुरुकिल्ली आहे.

विक्रांत पाटील 

vikrant.patil@gmail.com

संगणकतज्ज्ञ. त्यांचा गणित, पर्यावरणस्नेही जीवनशैली, मानसशास्त्र, अशा विविध विषयांचा अभ्यास आहे.

चित्र : इंटरनेटवरून साभार