शितावरून भाताची परीक्षा

बसवंत विठाबाई बाबाराव 

रडून रडून काल कपिलचे डोळे सुजले होते, तोंड बारीक झालं होतं, पोटात अन्न नसल्यानं अंगात त्राण नव्हतं. सकाळची प्रार्थना पूर्ण होईपर्यंतही त्याला उभं राहवेना. एका पायावर, भिंतीला रेलून कसं बसं तसं प्रार्थना पूर्ण केली. मग एकदाचा आपली जागा पकडून बसला.

दप्तरात डोकं घालून तो बराच वेळ काहीतरी करत होता. एक-दोन पोरं त्याच्याकडे पाहून दबक्या आवाजात, फिस्स फिस्स हसत होती. नेमका प्रकार माझ्या लक्षात येईना.

हसणाऱ्या पोरांच्या घोळक्याजवळच मनीषा होती. मनीषा तशी ‘अभ्यास बरा आपण बरं’ असं मानून कुणाच्या अध्यात मध्यात नसते. 

मी तिला जवळ बोलवलं.

“मनीषा, पोरं का बरं हसत आहेत? कपिलला काय झालं आज?”

“सर, काल बाजार होता ना. कपिलच्या बाबांनी त्यांची म्हस विकली.”

“पण मग म्हस विकल्यामुळे कपिलला काय झालं?”

“सर, कपिल त्या म्हशीच्या वासरासोबत खेळायचा ना. म्हशीसोबत ते वासरूपण विकून टाकलं. म्हणून कपिल काल लई रडला. म्हणून ही पोरं त्याला हसत्यात.”

आता मला सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. हसणाऱ्या पोरांना थोडी प्रेमानी समज दिली.

“अरे पोरांनो, असं कुणावर हसू नये. कपिलला त्या वासराचा लळा लागलेला होता. वासरू विकल्यामुळे त्याला आधीच दुःख झालेलं आहे. दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपण त्याला मदत केली पाहिजे.”

मुलांना मात्र ही भावनिक बाब इतक्यात नीट उलगडणारी नव्हती.
“आता नाही हसणार सर. आमचं चुकलं,” असं म्हणून मुलं गप्प झाली.

आज वर्गात या विकलेल्या म्हशीबद्दल, कपिलच्या भावनेबद्दल थोडं बोलायचं ठरवलं.

“कपिल! अरे, इतकं दुःख का झालं तुला? कधीतरी म्हस विकणारच होते ना?”

दूध देणारी म्हस का विकली असेल, हे मलाही कोडंच वाटत होतं.

“कपिल, म्हस दूध देत होती ना रे? मग का विकली?”

पोरांच्या हसण्यामुळे कपिल स्वतःचं दुःख आवरून दप्तरात मुंडी घालून बसला होता. आता परत मी नेमका त्याच विषयाला हात घातल्यामुळे त्याला हुंदका दाटून आला, डोळ्यातून पाणी वाहू लागलं. 

हुंदके देतच कपिल बोलायला लागला, “मीपण तेच म्हणत होतो सर. दूध देते तोवर विकू नका. पण कुणीच ऐकलं नाही.”

शेत, शिवार, म्हस हे महादूचे आवडीचे विषय. त्यामुळे यातील नेमकी गोम, तपशिलातली माहिती महादूला असतेच. तो स्वतःहून चर्चेत भाग घेत बोलायला लागला.

“सर, शिवारातला सगळा चारा संपून जातो. मग चारा कुठून आणायचा? कपिलच्या बाबांनी दोन वर्षांपासून रानडुकरांना भिऊन ज्वारीपण पेरली नाही. त्यामुळे कडबापण नाही. काय करणार मग? टाकली विकून.”

चाऱ्याच्या मुद्द्यावर महादूला थांबवत प्रथमेश मध्येच म्हणाला, “रानापूर शिवारात टेकडीवर किती लई गवत आहे. चारा का नाही? शिवारात जाऊन चारा आणणं होत नाही, म्हणून म्हस विकली.”

महादूचा मुद्दा खोडणं अवघड होतं. त्यातल्या त्यात हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. 

महादू परत आपला मुद्दा स्पष्ट करू लागला.

“आपल्या गावात किती जनावरं आहेत माहिती आहे का तुला? इतक्या जनावरांना तो चारा पुरेल का? मी माझ्या म्हशीसाठी तिथूनच गवत आणतो. सगळे जर तिकडे गेले, तर आठ दिवसात तिथला चारा संपून जाईल.”

चारा, जनावरं, यांचं मोजमाप या गोष्टींबद्दल चर्चा सुरू होती. मी या चर्चेत सक्रिय सहभाग घेणं टाळलं. मात्र माझ्या डोक्यात एक वेगळाच उपक्रम आकार घेत होता. मोजमाप अभ्यासाचे वेगवेगळे प्रकल्प-विषय मनात येत होते.

भावनिक झालेला कपिल मात्र ही चर्चा नुसती ऐकत होता. वर्षा, अमृता यांनीही चर्चेत भाग घेतला. चारा राहिला असता तर लोकांनी जनावरं का विकली असती, असा मुद्दा त्यांनी मांडला.

हे सगळं सुरू असताना माझी तंद्री लागली. डोक्यात तीन-चार अभ्यास-प्रकल्प तयार झाले होते. 

मग मी विचारातून बाहेर येऊन मुलांना विचारलं. 

“उत्तर मिळालं का? कपिलची म्हस का विकली गेली?”

सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत महादू म्हणाला, “हो सर, चारा नाही म्हणून विकतात.”

पण प्रथमेशच्या चेहऱ्यावरून तो या मुद्द्याशी पूर्ण सहमत नाही, असं वाटत होतं. बहुमत महादूच्या बाजूनं असल्यामुळे त्यानं माघार घेतली होती.

मी मुद्दाम प्रथमेशची बाजू घेतली, “अरे महादू, पण रानापूरच्या शिवारात किती गवत आहे, हे तुला माहिती आहे का? तिथला चारा आणला तर जनावरं विकायची गरज नाही.”

“आपल्या गावात किती जनावरं असतील, कुणाला माहिती आहे का?” मी प्रश्न विचारल्याबरोबर मुलांचं मोजमाप सुरू झालं.

अमक्या गल्लीत इतकी, त्यांच्या गल्लीत इतकी…
“दोनशे असतील… अडीचशे असतील… तीनशे असतील…”

“जनावरांमध्ये शेळ्या-मेंढ्या पकडायच्या का सर?” इतका वेळ चर्चेत सहभागी न झालेल्या अनुजनं मध्येच विचारलं.

“हो. ज्या ज्या जनावरांना चारा लागतो ती सर्व जनावरं मोजलीच पाहिजेत,” मी स्पष्ट केलं.

“जनावरांचा हिशेब मांडताना गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, घोडे, गाढवं या प्रत्येकाचा आकडा वेगवेगळा काढावा लागेल.”

आपला मुद्दा किती महत्त्वाचा आहे याची आता कपिलला जाणीव झाली होती. त्याचं दुःख बरंचसं कमी झालं होतं. त्यानं मत मांडलं. “सर, उद्या आपापल्या गल्लीतली जनावरं मोजून यायची का?”

“अगदी बरोबर कपिल. उद्या सर्वांनी आपापल्या गल्लीमधली सर्व जनावरं मोजून यायचं. हाच तुमचा उद्याचा गृहपाठ!”

“तुमचे सर काहीपण मोजायला सांगतात. हे काय अभ्यास असतो का, असं आई आणि शेजारी मला हसत होते,” मनीषानं सांगितलं.

“मनीषा, हसू दे त्यांना. हे सगळं त्यांच्यासाठी नवीन आहे. हळूहळू सवय होईल आणि महत्त्वही पटेल त्यांना.”

मुलं कामाला लागली… कोणत्या गल्लीतली जनावरं कोण मोजणार…

गल्ली कुठे सुरू होते, कुठे संपते याची काही काटेकोर रेषा नव्हती. चर्चा करून मुलांनी यावर तोडगा काढला. बघता बघता मुलांनी सर्व गावाची जनावरं मोजायची जबाबदारी वाटून घेतली. 

पृथ्वीराज त्याच्या हिश्शाला आलेल्या गल्लीबद्दल थोडा नाखूष होता.

“काय झालं पृथ्वीराज? काही अडचण आहे का?”

“सर, परीट-गल्लीत कुत्रे राहतात, मी एकटा तिकडे जाणार नाही. मला सोबत कोणीतरी द्या किंवा गल्ली बदलून द्या.”

अमृताला त्याच्या बरोबर जाण्यास सांगितलं. तिचं घरही त्या भागापासून जवळच होतं. पृथ्वीराजचा प्रश्न सुटला. 

मोजमाप कसं करायचं, नोंदी कशा घ्यायच्या याचा मुलांनी तक्ता आखून घेतला.

मन्या हा वर्षाचा भाऊ. आतापर्यंतच्या चर्चेत हा कुठेच नव्हता. त्यानं त्याची शंका विचारली, “सर गायी-म्हशी लिहिताना त्यांच्या वासरांची वेगळी नोंद करायची का?” 

मी त्याचं कौतुक केलं. कारण हा मुद्दा महत्त्वाचा होता. “छोट्या वासरांना चारा कमी लागतो, आपण ही सर्व मोजमापं चाऱ्यासाठी करत आहोत. एक वर्षापर्यंतच्या वासरांची नोंद वेगळी करा आणि वर्षापेक्षा मोठी वासरं असतील, तर त्यांचा मोठ्या जनावरांच्या यादीत समावेश करा.” असं स्पष्टीकरण दिलं.

सगळ्यांना पटलं. महादू मात्र थोडा साशंक वाटला. त्याची शंका नेमकी काय असेल याची मला कल्पना आली. एक वर्षाचं झालं, तरी वासरू मोठ्या म्हशीपेक्षा कमी चारा खातो असं काहीतरी त्याच्या डोक्यात सुरू असेल हे जाणवलं. मात्र आता प्रार्थनेची वेळ झाली होती.

प्रथमेश आणि मनीषा दोघं समोर आले. ‘खरा तो एकची धर्म…’ ही साने गुरुजींची प्रार्थना झाली. नवीन आगळावेगळा गृहपाठ घेऊन मुलं घराकडे गेली. 

दुसऱ्या दिवशी विश्वनाथअण्णाच्या दुकानातून मी तराजू आणि काही वजनं घेऊन आलो. मुलांना सकाळीच बोलवलं होतं. प्रत्येक जण टेबलवर ठेवलेल्या तराजूकडे बघत, त्यांच्या मनातील तर्क बोलून दाखवत. 

काही मुलं विनोदानं, “सर आता शेन मोजायचं गृहपाठ देतात की काय?” असं म्हणून हसत होती. 

सर्व मुलं जमली. प्रार्थना झाली. मुलं आपला केलेला गृहपाठ दाखवायच्या तयारीत होती. मी त्यांना थांबवलं. “हे जनावरांचं मोजमाप तुम्ही उद्या पक्कं करा.” 

महादेवी आणि करुणा या नववीतल्या मुलींना सर्वांचे गृहपाठ तपासून, गावातील एकूण जनावरांचं गणित मांडून आणायला सांगितलं. 

“मुलांनो, आजची आनंदशाळा आपण रानापूरच्या शिवारात घेऊया! सगळ्यांनी घरून पाणी-बॉटल घ्या, अन् रानापूरच्या वाटेवरच्या चिंचेखाली जमा,” असं सांगितलं. 

बाहेर जायचं म्हटलं, की मुलांचा उत्साह काही पाहायलाच नको. मुलं अगदी धावत पळत जाऊन, पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन चिंचेखाली जमली.

तराजू, एक विळा, एक छोटी पिशवी, नोंदीसाठी वही-पेन… सर्व घेऊन रानापूरचं शिवार गाठलं. 

पृथ्वीराज, “सर शिवारातलं सर्व गवत कापून मोजायचं का?” 

महादू, “महिना लागेल एवढं गवत कापायला.”

प्रथमेश, “या तराजूत एकच किलो गवत मावते, गवत मोजयाला आणखी एक महिना!”

आपण काय करणार याचा मुलांना अंदाज आला; मात्र कसं करणार हे अजून उलगडलं नव्हतं.

रानापूर शिवारात हनुमान मंदिर होतं, तिथल्या वडाखाली गोल करून बसलो.

“मुलांनो, भात शिजला आहे, हे आई कसं सांगते? माहिती आहे का?”

“चमच्याने थोडे दाणे घेते, बोटानी दाबून बघते आणि सांगते,” मनीषाने बरोबर सांगितलं.

“अगदी बरोबर!”

“भात शिजला आहे की नाही हे कळण्यासाठी सर्व भात खाऊन बघून मग शिजलाय असं कुणी सांगतं का?”

“नाही सर,” सगळ्यांनी एका सुरात सांगितलं.

“तसंच आहे, आपल्याला सर्व शिवारातलं गवत कापून वजन करायची गरज आहे का?”

“… तर नाही, गवताचंही तसंच आहे. शितावरून भाताची परीक्षा!”

“आपण एक छोटीशी चौकोनी जागा निवडून, त्यातील गवत कापून, त्याचं वजन करायचं. मग रानापूरच्या पूर्ण शिवारात असे किती चौकोन होतील याचा अंदाज बांधायचा. म्हणजे आपल्याला पूर्ण शिवारात किती गवत असेल, ते कळेल.”

आता मुलांना हळूहळू उलगडू लागलं. एकच चौकोन घेतल्यास उत्तर बरोबर येणार नाही, म्हणून चार-पाच वेगवेगळ्या जागांवरील चौकोनातून गवत मोजून, त्यांची सरासरी काढायची. चार गटांत विभागून मुलांनी कापणी आणि मोजणी केली. नोंदी घेतल्या. वजनाची एककं, ती मोजायची कशी, पासंग म्हणजे काय… सर्व गोष्टी समजून घेतल्यामुळे मज्जा दुपटीची झाली. महादूनं गवतांची नावं सांगितली. कुठलं गवत म्हशीला आवडतं, कोणत्या गवतापासून झाडू बनतात ही माहितीही दिली. ऊन वाढत चाललं होतं, तरीही मुलं शिवारातून निघायला तयार नव्हती.

घरी जायला निघण्यापूर्वी सर्वजण वडाखाली जमली. प्रत्येकानं आपला अनुभव सांगितला.

अमृता म्हणाली, “सर, आज तर आपली शिवारफेरीच झाली!”

वर्षा हसत म्हणाली, “रोज आपली आनंदशाळा इथंच घ्यायची का?”

सर्वांना हा उपक्रम खूप आवडला होता.

“मुलांनो, आता पुढचं काम समजून घ्या. गवत मोजायला मज्जा आली आहे, पण त्याचं पुढचं गणितही आव्हानात्मक आणि मजेशीर आहे. मन लावून कराल तर तेही जमेल.”

प्रथमेश म्हणाला, “शिवारात एकूण किती गवत आहे, ते शोधायचं ना?”

“बरोबर!” मी म्हणालो. “पण याचसोबत आपल्या गावातील सर्व जनावरांची संख्यादेखील मोजायची आहे. मग आपण पाहू, आपल्या गावातील जनावरांना हा चारा पुरेसा आहे का.”

“मग एका म्हशीला एका वर्षात किती चारा लागतो, हे कसं मोजणार?” महादूनं उत्सुकतेनं विचारलं.
“अगदी बरोबर, महादू! त्यासाठी आधी एका म्हशीला एका दिवशी किती चारा लागतो हे पाहावं लागेल. मग बाकीचा हिशेब करता येईल.”

अमृता हसत म्हणाली, “सर, एक गणित संपत नाही, एकापासून दुसरं गणित सुरू होतं!”

“हो अमृता, खरं आहे. खरं गणित नेहमी असंच असतं. शिकत-शिकत, मोजत-मोजत पुढे जात राहावं लागतं. पण यातून फक्त गणितच नाही, आपल्या गावातील लोक दिवाळीनंतर जनावरं का विकतात हेही समजेल.”

मुलांना हे पटलं. कपिल त्याचं दुःख काहीसं विसरला होता. त्याला वाटत होतं, की कदाचित त्याचं वासरू परत येऊ शकेल.

कपिलनं हळूच माझ्याकडे पाहिलं.

त्याच्याकडे पाहत मी म्हणालो, “आणि कदाचित… पुढच्या वेळी कोणाचं वासरू विकायची वेळ येणार नाही.”

दोन दिवसांपासून दु:खी असलेला कपिल, एकदाचा मनापासून हसला. 

बसवंत विठाबाई बाबाराव

baswantv@gmail.com