विष्णूच्या पडवीत भरली आनंदशाळा
लाकूडकामातील गणित
बसवंत विठाबाई बाबाराव
आठवडा झाला विष्णू आनंदशाळेत आला नाही. विष्णू स्वभावाने शांत, बुजरा. मुलांमध्ये अगदी एकजीव मिसळणारा. तो आनंदशाळेत नसला, की त्याची उणीव जाणवायची. विष्णूचं घर अगदी तीन-चार घरं पलीकडे. मुलं आनंदशाळेत यायला अजून घटकाभर वेळ होता, तर म्हटलं आज त्याची खबरबात घ्यावी. विष्णूच्या घराकडे निघालो.
गोशट्टीचं घर, त्यापुढे डावीकडे थोडं आत गेलं की विष्णूचं घर. मुख्य रस्त्यापासून मी आत वळणार, इतक्यात मला गावाच्या दुसऱ्या टोकाला राहणारा पृथ्वीराज, अमृता-अनुज, श्रीदेवी-महादेवी यांचा घोळका येताना दिसला. त्यांनीही मला तिकडे वळताना पाहिलं आणि आपला मोर्चा विष्णूच्या घराकडेच वळवला.
मी म्हटलं, “मुलांनो तुम्ही इकडे कुठे? घराकडे चला आपण लगेच सुरू करूया.”
मुलं कुठली जातात, तीही माझ्या सोबत सोबत विष्णूच्या घरी हजर.
विष्णूच्या घरी मागच्या पडवीत, उघड्या अंगानं, दरवाजाच्या एका बाजूवर संतू नक्षी कोरत बसला होता. तिथेच थोड्या पलीकडे विष्णू संतूनं आखून दिलेल्या मापात लाकडी पट्टी कापून तुकडे करत बसला होता.
एकदम सर्व मुलं आणि मला पाहून विष्णू थोडा गोंधळला. संतूचंही लक्ष त्याच्या समोर उभ्या असलेल्या पोरांकडे आणि माझ्याकडे गेलं.
“सर, आज सगळी शाळाच इकडे घेऊन आलात!” अशा येण्याचा नेमका उद्देश समजून घेण्याच्या अर्थानं संतूनं बोलायला सुरुवात केली.
मी म्हणालो, “होय, विष्णू काही आनंदशाळेत येत नाही, म्हटलं आनंदशाळाच इकडे घेऊन यावी.”
“हे बेस्ट केलं सर, सर्व सुतारकाम शिकवून टाकूया पोरांना. शाळा शिकून काय नोकरी लागत नाही, कमीतकमी काम तरी शिकतील.”
संतूच्या बोलण्याचा सूर विनोदी होता; मात्र माझ्या डोक्यात झर्रकन् एक उपक्रम तयार झाला. वरवर मी संतूशी बोलत होतो, डोक्यात मात्र मुलांना सुतारकामातील कोणत्या कोणत्या गोष्टींची ओळख करून देता येईल, त्यांची मुलांच्या विषयातील कोणकोणत्या घटकांशी, संकल्पनांशी जोडणी करता येईल हे सगळं सुरू होतं.
“संतू, आमच्या मुलांना खरंच सुतारकामाची ओळख करून द्यायची आहे; जमलं तर आजच करूया ते. पण मला सांग विष्णूला आनंदशाळेत का पाठवत नाहीस?”
“अजून एक आठवडा अवघड दिसते सर. कंगटीचं (तेलंगणा राज्यातलं एक गाव) एक मोठं ऑर्डर मिळालं. लवकर काम करून द्यायचं आहे. हाताखाली मदतीला म्हणून मीच आठवडाभर जाऊ नको म्हटलं.”
कंबार संतूचा मुलगा विष्णू. कंबार म्हणजे लोहार. विष्णूच्या घरी पिढीजात लोहारकाम. मात्र पुण्यात वेगळी वाट धुंडाळत जाऊन संतू सुतारकाम शिकून आला. हळूहळू बलुत्यातलं लोहारकाम मागे पडून घरात सुतारकामं मोठ्या प्रमाणत सुरू झाली. दारं-खिडक्या, कवाडी, कपाटं, बाजा, पलंग, घरातलं फर्निचर… असा कामाचा मोठा व्याप संतूच्या मागे असतो. जुनी कौलारू घरं बांधायची तर वासे, तुळई बनवणं, त्यांना एका रेषेत बसवणं ही कामंही संतू करे. कामं नसली, की संतू निवांत गप्पा करत बसायचा. मोठ्या कामाच्या ऑर्डरी आल्या की मात्र दिवसरात्र जागून कामं पूर्ण करून द्यावी लागायची. सुतारकामात मुख्य काम करणारा कारागीर एक असला, तरी त्याच्या हाताखाली मदतीला घरातल्या सगळ्या माणसांना राबावं लागायचं. कंगटीचं काम पूर्ण होईपर्यंत विष्णूला आनंदशाळेत येणं जमणार नाही असं दिसत होतं.
मीही विनोदानं संतूला म्हटलं, “कंगटीचं काम पूर्ण होईपर्यंत आम्ही आनंदशाळा इकडेच भरवत जाऊ.”
“का नाही सर, चांगलंच होईल. चार शब्द आमच्याही कानावर पडतील.”
इतक्यात घराकडे गेलेली इतर मुलंही विष्णूच्या घरी आली. महादू त्या दुसऱ्या गटाचा नेता बनला होता.
“ओ सर, तुम्ही सगळी मुलं घेऊन इकडे आलात, आम्ही तिकडे वाट बघत बसलोय. विष्णूच्या घरीच भरवायची का आनंदशाळा?” महादूनं थोडी तक्रार व थोडं विनोदी पद्धतीनं विचारलं.
आता आनंदशाळेतली जवळजवळ सगळी मुलं इकडे जमली होती. म्हटलं, फुरसतीत परत मुलांना आणूयाच; मात्र आता जमली आहेत तर सुतारकामांची थोडीफार ओळख होऊनच जाऊ दे.
मी म्हटलं, “होय महादू, आज आनंदशाळा इथेच होईल. आज विष्णू आपल्याला त्याच्या कामाविषयी माहिती सांगणार आहे. विष्णूच आज आपला शिक्षक!”
संतूला हे आवडलं. विष्णू मात्र पुढे यायला तयार होईना. त्याची दुहेरी पंचाईत झाली. वडिलांपुढे आपलं भांडं फुटेल… सर्व पोरं हसतील… आता पुढे येऊन काय बोलायचं?
त्याची ही अवस्था मला समजली. त्याचं काम थोडं हलकं करण्यासाठी मी पुढाकार घेतला.
“विष्णू, ह्या लाकूडकामाच्या औजारांची नावं काय आहेत, त्यांची कामं काय काय आहेत हे आम्हाला सांग.”
ह्या अवजारांची नावं आणि कामं माहीत असणारा आमच्यात विष्णू हा एकमेव होता; मग त्याला थोडा आत्मविश्वास आला. तो त्याच्या हातातल्या लाकडी फळीचे छोटे छोटे तुकडे करत होता. ती पट्टी घेऊन समोर आला.
“ही आरापट्टी. पातळ लाकूड-पट्टी, छोटं बारीक लाकूड कापायचं असलं, तर ही पट्टी वापरतात. प्लास्टिक पाईप, बारीक लोखंडी गज कापायलापण हे वापरतात.”
मुलं लक्षपूर्वक ऐकत होती.
विष्णूनं बाजूला ठेवलेली थोडी मोठी आरी उचलली.
“ही मोठी आरी. मोठे ओंडके कापायचे असतील तर ही वापरतात. यात दात मोठे असतात. यापेक्षा थोडी मोठी असते त्याला करवत म्हणतात.”
पुढे सरकत पृथ्वीराज म्हणाला, “म्हणजे आरीलापण दात असतात?”
पोरांचा हशा पिकला.
विष्णू म्हणाला, “लाकूड धरून ठेवायला. दात नसतील तर आरी घसरेल.”
तो आरीचा पात्याचा भाग मुलांना दाखवू लागला. मुलं अगदी जवळून पाहू लागली.
विष्णूची प्राथमिक माहिती सांगून झाली, की संतू त्याबद्दलची अधिकची माहिती सांगायचा.
“करवतपण दोन प्रकारच्या असतात; एका हाताने चालवायच्या आणि दुसरी दोन्ही बाजूला मुठी असणाऱ्या. मोठ्या खोडाचा बुंधा कापायचा तर मोठी करवत.”
“आज ही करवत आणि बऱ्याच औजारांचा वापर कमी व्हायला लागला आहे, नवीन विजेवर चालणारे मशीन आलेत.” अवजारं कशी बदलत जात आहेत त्याबद्दल संतूनं माहिती सांगितली.
इतक्यात अमृतानं एक वेगळं अवजार हातात घेतलं.
“हे काय?”
“तो रंदा. लाकूड गुळगुळीत करायला,” विष्णू म्हणाला.
त्यानं एक लाकडी फळी घेतली आणि रंधा फिरवला. लाकडाची बारीक कुरळी पट्टी बाहेर आली.
हे बघून मुलांना आनंद झाला. काहींनी ते रंध्यातून निघालेले पापुद्रे हातात घेऊन बघितले.
“अरे वा! कागदासारखं निघतंय!” अनुज म्हणाला.
संतू हसत म्हणाला, “रंदा नीट चालवला की लाकूड आरशासारखं गुळगुळीत होतं.”
विष्णूनं पुढे अजून एक साहित्य घेतलं. “हे पटास, याला ‘चिरणम’पण म्हणतात. नक्षी काढायला वापरतात.”
बाबांकडे बोट दाखवत तो म्हणाला, “बाबा आत्ता जे करत आहेत ते.”
पडवीत बसून मुलं त्या दरवाजावरील नक्षीकाम पाहू लागली. फुलं, पानं, वळणदार रेषा… लाकडातून हळूहळू उमटत होती.
ते पाहून श्रीदेवी म्हणाली, “हे तर चित्रासारखं दिसतंय.”
विष्णू म्हणाला, “पहिल्यांदा पेन्सिलिनी रेषा काढतात. मग चिरणमने लाकूड कोरतात.”
थोडी मुलांची परीक्षा घेण्याच्या मूडमध्ये येऊन संतूने एक प्रश्न विचारला, “ही फळी दोन फूट आहे. याचे बरोबर चार तुकडे करायचे असतील तर किती मापावर कापायचं?”
मुलं विचारात पडली.
पृथ्वीराज थोडा वेळ बोटांवर मोजत राहिला आणि म्हणाला, “अर्धा फूट?”
हलकंसं हसत संतूने मान हलवली.
“हो… बरोबर. दोन फूट म्हणजे चोवीस इंच. चार तुकडे करायचे असतील तर प्रत्येक सहा इंच.”
तो पट्टीवर सहा सहा इंचाचे मार्क काढू लागला.
“एक… दोन… तीन…”
महादू लगेच म्हणाला, “अरे, हे तर गणित झालं!”
मी हसून विचारलं, “मग सुतारकामात गणित लागतं की नाही?”
संतू लगेच म्हणाला, “लागतं सर, भरपूर लागतं. माप चुकलं की सगळं काम बोंबलतं.”
विष्णू आता थोडा धाडसाने बोलू लागला.
तो म्हणाला, “समजा दरवाजा बनवायचा आहे. तर आधी चौकट मोजतात. चौकट सात फूट उंच आणि तीन फूट रुंद असेल, तर दरवाजा थोडासा कमी करावा लागतो.”
अमृता विचारली, “का?”
विष्णू म्हणाला, “नाहीतर दरवाजा अडकतो. उघडायला जागा नको का?”
संतूने हसत सांगितलं, “एकदा असंच झालं होतं. माप चुकलं. दरवाजा लावल्यानंतर तो उघडायलाच तयार नव्हता. शेवटी पुन्हा रंदा चालवावा लागला.”
मुलं चर्चेत रंगली होती.
विष्णूने मग एक वेगळं अवजार उचललं. “हे बघा, कोनमापक.”
मुलं थोडी चकित झाली.
अनुज म्हणाला, “हे शाळेतल्या गणिताच्या तासासारखं वाटतंय.”
विष्णू म्हणाला, “दोन फळ्या जोडायच्या असतील तर कोन बरोबर असायला हवा. नाहीतर चौकट वाकडी होते.”
त्यानं दोन फळ्या जमिनीवर ठेवून ९० अंशाचा कोन दाखवला.
“हा बघा… सरळ कोन.”
इतक्यात महादूने बाजूला पडलेला हातोडा उचलला. “हे तर मला माहिती आहे. हातोडा!”
विष्णू म्हणाला, “हो. खिळे ठोकायला.”
महादूने खिळा लाकडावर ठेवला. “मी ठोकू का?”
संतू म्हणाला, “ठोक, पण बोट सांभाळ.”
महादू खिळा ठोकू लागला… खिळा थोडा वाकला.
सगळे हसू लागले.
विष्णू म्हणाला, “पहिल्यांदा खिळ्याला हलका मारायचा. खिळा नीट उभा राहिला की मग जोरात, म्हणजे वाकडा होत नाही.”
त्याने पुन्हा खिळा सरळ केला आणि दोन टप्प्यांत नीट ठोकून दाखवला.
पृथ्वीराज म्हणाला, “अरे वा! विष्णूला तर खूप माहिती आहे.”
विष्णू थोडा लाजला. मग त्याने आणखी एक किस्सा सांगितला.
“एकदा बाबांनी मला सांगितलं, छोट्या पलंगाची चौकट बनव. मी चार फळ्या जोडल्या. पण कोन नीट मोजला नाही. पलंग असा झाला की एका बाजूला बसलं की दुसरी बाजू वर उचलायची!”
संतूही हसत आपल्या मुलाचं बोलणं ऐकत होता.
“तेव्हा मला कळलं, मोजमाप चुकलं की काम चुकतं.”
विष्णू पुढे म्हणाला, “पलंग बनवताना लांबी, रुंदी, उंची सगळं मोजावं लागतं. लांबी सहा फूट आणि रुंदी चार फूट असेल तर चौकट कशी बनवायची?”
महादू म्हणाला, “चार लाकूड!”
विष्णू म्हणाला, “हो. पण जोडताना कोन सरळ हवा.”
त्याने मातीवर चौकोन काढला. “ही बघा चौकट. चार बाजू सारख्या नसल्या तरी कोन सरळ हवा.”
मी लक्षात घेतलं, मुलं आता केवळ ऐकत नव्हती, तर समजूनही घेत होती.
अमृता म्हणाली, “म्हणजे लाकूडकाम नुसतं काम नाही, त्यात गणितपण आहे.”
संतू म्हणाला, “आणि भाषाही..!.” संतूने पुढे त्याच्याकडील अवजारांची तेलगू आणि कानडी नावं सांगितली..
इतक्यात विष्णूने एक छोटा लाकडी तुकडा उचलला.
“यातून मी एक खेळणं बनवलं होतं.” त्याने एक छोटी लाकडी बैलगाडी दाखवली.
मुलं कौतुकाने पाहू लागली.
श्रीदेवी म्हणाली, “अरे वा! हे तर खूप छान आहे.”
विष्णू म्हणाला, “लाकडातून काहीही बनवता येतं.”
पृथ्वीराज म्हणाला, “मग आपण उद्या काही बनवूया का?”
संतू हसत म्हणाला, “का नाही? पण आधी माप शिकावं लागेल.”
संतू आणि विष्णू दोघांनी मिळून पडवीत पडलेले बरेच लाकडी ओंडके, काही अर्धवट काम करून झालेली दारं, खिडक्या दाखवल्या.
त्या दिवशी आनंदशाळा पडवीतच भरली. लाकडाचा सुगंध, अवजारांचा आवाज आणि मुलांच्या प्रश्नांनी ती शाळा वेगळीच रंगली.
घरी परतताना महादू म्हणाला, “सर, उद्या पुन्हा इथेच शाळा घेऊया.”
मी विचारलं, “का?”
तो म्हणाला, “अजून खूप औजारं बाकी आहेत, आम्हाला ती सर्व माहिती करून घ्यायची आहेत!”
ते मलाही जाणवलं; किमान काही दिवसांच्या शिकण्या-शिकवण्याचा विषय आहे हे लाकूडकाम.
आज मुलांनी फक्त सुतारकाम पाहिलं नाही, तर कामात दडलेलं गणित, मोजमाप, कोन, वेगवेगळ्या भाषेतली नावं, त्या शब्दांचा अर्थ अशा बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ज्याला ते शांत, बुजरा समजत होते, तो विष्णू आज त्यांच्या समोर शिक्षक म्हणून उभा होता.
बसवंत विठाबाई बाबाराव

गेली पंधरा वर्षे शाळेमधील पर्यावरण शिक्षण विषयात कार्यरत. पुण्यातील वनराई संस्थेच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक.
