अभिवाचन कार्यक्रम – एक अविस्मरणीय अनुभव
अभिवाचन हा केवळ कविता किंवा साहित्य वाचण्याचा कार्यक्रम नसून शब्द, भावना आणि अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम असतो. अशाच एका सुंदर अभिवाचन कार्यक्रमाचे खेळघरात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध रंगकर्मी मीनाताई सासणे आणि सुखायनचे नितीन मोरे यांचे प्रभावी अभिवाचन उपस्थितांना अनुभवायला मिळाले. त्यांच्या ओघवत्या वाणीमुळे शब्दांना जणू जिवंतपणा प्राप्त झाला आणि सर्वजण मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाला चैतन्य देवकर यांनी संगीताची सुरेल साथ दिली. त्यांच्या संगीतामुळे अभिवाचनातील भाव अधिक खुलून आले. तसेच जान्हवी बेंद्रे, दयानंद मेणसे, दिनेश मेणसे आणि रविराज सामाले यांनीही आपल्या सहभागातून कार्यक्रम अधिक समृद्ध केला.
या उपक्रमात प्राथमिक गटातील सुमारे ४० ते ४२ मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुलांनी अभिवाचन ऐकत साहित्य, भाषा आणि अभिव्यक्ती यांचा आनंद घेतला. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या भाषिक विकासाबरोबरच ऐकण्याची, समजून घेण्याची आणि विचार करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.
गोष्टीचे अभिवाचन करताना अधून मधून वातावरण निर्मिती करण्यासाठी मुलांच्या समुहावर ओरिगामी – कागदी बेडूक टाकायचे त्यामुळे धमाल येत होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे अनेक ताईंनी मनापासून मेहनत घेतली. शुभदा काकू, जयश्रीताई, मीनाताई, सपना ताई आणि अनुराधा ताई यांनी मुलांची योग्य व्यवस्था, नियोजन आणि मार्गदर्शन करून कार्यक्रम सुरळीत पार पाडला. त्यांच्या समर्पित योगदानामुळे मुलांना एक आनंददायी आणि ज्ञानवर्धक अनुभव मिळाला.
हा अभिवाचन कार्यक्रम मुलांसाठी साहित्याची गोडी निर्माण करणारा, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा आणि भाषेप्रती प्रेम वाढवणारा ठरला. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच हातभार लागतो. कार्यक्रमातील सर्व मान्यवर, आयोजक आणि सहभागी मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. ![]()
मीनाताई वाघमारे
खेळघरातील शिक्षिका

