2022 जोडअंकाबद्दल वाचक लिहितात

पालकनीती आता वाचून झाला. एकूणात आवडला. सायली तामणे, परेश जयश्री मनोहर आणि उर्मी चंदा यांचे लेख वेगवेगळ्या कारणांनी सर्वाधिक आवडले. काही लेख मात्र क्लिष्ट झाले आहेत (माधुरी दीक्षित); तर पहिलाच लेख (अमन मदान) वाचकांना कमतर पातळीवर ठेवून मध्येच प्रवचन देतो आहे असा भास झाला. या दोन लेखांना संपादकीय संस्कार मला आवश्यक वाटले. अ‍ॅकॅडेमिक लेख मासिकात येताना उदाहरणं वगैरे देत सामान्य लोकांना समजतील असे यायला हवेत; पण हे दोन लेख सोडले, तर अंक आवडला. 

 ऋषिकेश दाभोळकर 


‘शांतीकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन’ हा लेख सर्वांनी आवर्जून वाचायला हवा आणि शक्य झालं तर त्यावर चर्चा करायला हवी. शांती आणि शांतता यातला फरक आणि आपल्या जीवनात त्याचं रोपण करण्याचा एक कठीणतम पण सरल मार्ग त्यात आपल्याला पाहायला मिळतो. बातम्या येतात आणि आपण लगेच त्यावर व्यक्त होऊन मोकळे होते. नवीनतम सामाजिक माध्यमाच्या संस्कृतीत रुजलेलं एक कर्मकांड करून आपण मोकळे होतो. परंतु आपण आणि आपला भवताल बदलावा म्हणून आपण काय करतो, यावर मात्र विचार होतोच असं नाही. तेव्हा निगुतीनं करण्याच्या कामात या कामांचाही समावेश केला गेला पाहिजे. स्वबदलाबरोबरच सामाजिक बदलाचा परीघ रुंदावत नेला पाहिजे. मुलांसोबत आपण हेच शिकलं आणि शिकवलं पाहिजे. हा लेख सर्वांनी आवर्जून वाचावा.

पालकनीतीचा दिवाळी अंक खरंच खूप नेटका आणि वैचारिक खतपाणी घालणारा झाला आहे. सर्वांनी विकत घेऊन तो वाचायला  हवा.

फारूक काझी


या वर्षीच्या पालकनीती दिवाळी अंकातील सगळेच लेख छान आहेत. अगदी दिवाळीतील फराळासारखे… प्रत्येकाचं महत्त्व वेगळं… काही लेख हलकेफुलके… काही आपल्या विचारांशी मिळतेजुळते… आणि काही वेगळ्या पद्धतीनं विचार करायला लावणारे…

काही लेखांचा / लेखकांचा आवर्जून उल्लेख करते…

‘हर्ट पीपल हर्ट हील्ड पीपल हील’ ही मुलाखत मला खूप आवडली.

अद्वैत दंडवते यांचा मूव्हीचा परिचय खूप विचारपूर्वक पण सहज, सोप्या शब्दात असतो.  वाचल्यानंतर आधी बघितलेला मूव्ही परत बघावासा वाटतो.

‘कुटुंबातील हिंसा आणि शांती’ या लेखातून आपल्या आजूबाजूला घडणार्‍या आणि त्यातून योग्य ते स्वतः अमलात आणण्यासाठी प्रयत्न याबद्दल प्रीती-पुष्पा-प्रकाश यांचं लेखनही छान आहे.

स्वाती भट यांच्या लेखातून थ्रिलिंग एक्स्पीरियन्स आला… अगदी पाकिस्तानात गेल्यासारखा अनुभव.

एकंदरीत यावेळीचा हा दिवाळी अंक उत्तम झाला आहे.

 मेघना दुबे