खेळघराचा परीघ वाढतो आहे….

2007 पासून खेळघराने, ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने ‘ या विषयाची प्रशिक्षणे घ्यायला सुरुवात केली.या दरम्यान खेळघर पद्धती सविस्तर सांगणारे मोठे पुस्तक लिहिले आणि त्याच्या तीन आवृत्या देखील निघाल्या.2020 पासून Wipro Foundation ने खेळघराच्या कामाची दखल घेऊन, Wipro च्या परीघातील भारतभरातील संस्थांसाठी, ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने ‘ ही वर्कशॉप्स घेण्याची संधी दिली.आता ही वर्कशॉप्स हिंदीमधून घ्यायची होती. त्यासाठी आमची प्रकाशने हिंदी आणि इंग्लिश मध्ये देखील भाषांतरित करण्यासाठी देखील Wipro ने आर्थिक पाठबळ दिले. 20-24 सप्टेंबर या दरम्यान असे हिंदी मधील दुसरे वर्कशॉप घेतले. या निमित्ताने भारतभरातील मुख्यतः हिंदी भाषिक संस्थांबरोबर काम करण्याची संधी मिळते आहे याचा आनंद मनात आहे. वंचितांच्या शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या 25-30 तरुण कार्यकर्त्याबरोबर पाच दिवस काम केले, संवाद साधला त्यामुळे मनात एक आशा जागी झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वंचीततांचा सामना करणाऱ्या मुलांची परिस्थिती या संवादातून आम्हाला समजली आणि आमच्या अनुभवातून आणि अभ्यासातून आम्हाला समजलेले या सर्व कार्यकर्त्यांना सांगता आले. काल workshop संपले तरी मी अजूनही त्या वर्कशॉपमध्ये, तेथे गुंफल्या गेलेल्या आस्थेच्या धाग्यांमध्ये व्यग्र आहे. उत्साहाने हाती घ्याव्यात अशा खूप गोष्टी दृष्टिक्षेपात येत आहेत. उत्साह आणि प्रेरणेने मन तुडुंब भरले आहे…

शुभदा जोशी