बाबा लिहायला शिकतो तेव्हा…

बाबा फार लहान असतानाच वाचायला शिकला. ‘हा अ आहे, हा आ आहे…’ असं म्हणत सगळी अक्षरं पटकन शिकला. त्याला खूपच मजा वाटत होती. तो फक्त चित्र बघत थांबला नाही, पुस्तकंच्या पुस्तकं वाचू लागला. पण लिहायला मात्र छोट्या बाबाला अजिबात शिकायचं नव्हतं. पेन्सिल हातात नीट कशी पकडायची तेही मुळी त्याला शिकायचं नव्हतं. आणि त्याला ती चुकीचीही धरायची नव्हती. त्याला फक्त वाचायचं होतं. लिहायचं नव्हतंच. वाचायला खूप मज्जा यायची आणि लिहिणं अगदी कंटाळवाणं वाटायचं.  

पण बाबाचे आईबाबा त्याला म्हणाले, “तुला लिहायचं नाहीये ना, मग तुला वाचायलाही मिळणार नाही.” आणि वर पुढे म्हणाले, “लिही ती अक्षरं!” 

सकाळपासून रात्रीपर्यंत, दिवसभर, लहानगा बाबा एवढंच ऐकत होता. रोज आपली तो अक्षरं लिहीत बसायचा; मन मारून. त्याचं अक्षर घाण होतं. ते कुरूप होतं आणि असं वाटायचं जणू त्यांना वशिंड आलेलं आहे. बाबाला स्वतःच्याच अक्षराकडे बघावंसं वाटायचं नाही. 

हो, त्याची अक्षरं म्हणजे नुसता गदारोळ होता. पण शाईचे ठिपके मात्र सुंदर होते. त्याच्या इतके मोठे आणि भारी शाईचे ठिपके कोणालाच देता येत नसत. हे सगळ्यांनाच मान्य होतं. शाईचे ठिपके पाडून लोकांनी लिहायला शिकायचं ठरवलं असतं, तर बाबाचं अक्षर जगात भारी झालं असतं. 

त्याचं एकही अक्षर धडकं नव्हतं. प्रत्येक पानावर हे मोठ्ठाले शाईचे डाग! बाबाला भरपूर ओरडा बसायचा आणि त्याला लाज वाटेल असं बोललं जायचं. प्रत्येक अक्षर दोन-दोन तीन-तीन वेळा लिहायला सांगितलं जायचं. पण तो जितकं जास्त लिहायचा, तितकं त्याचं अक्षर अजूनच घाण होत जायचं आणि शाईचे डाग आणखी मोठ्ठाले होत जायचे. 

त्याला कळतच नव्हतं, की सगळे त्याच्या मागे का लागले आहेत. त्याला वाचता तर येत होतं ना! आता त्याला शब्द लिहायचे होते; एकेक सुटी अक्षरं लिहायची नव्हती. पण मोठ्यांचं म्हणणं होतं, की अक्षरं लिहिता आल्याशिवाय तुला एकही शब्द लिहिता येणार नाही. त्याचा त्यांच्यावर विश्वासच नव्हता. त्याला काही हे खरं वाटत नव्हतं. तो शाळेत गेला तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं, की बाबा किती छान वाचू शकतोय आणि किती घाण लिहितोय. अख्ख्या वर्गात त्याचं हस्ताक्षर सगळ्यात घाणेरडं होतं. 

खूप वर्षं गेली. छोटा बाबा मोठा झाला. त्याला वाचायला अजूनही खूप आवडतं आणि लिहायचा प्रचंड कंटाळा येतो. त्याचं अक्षर इतकं वाईट्ट आहे, की बर्‍याच जणांना वाटतं की तो हे मुद्दामच करतोय. 

कधीकधी बाबालाच खूप शरमल्यासारखं होतं. 

एकदा तो पोस्टात गेला. तिथला कर्मचारी त्याला म्हणाला, “तुम्हाला लिहिता येत नाही का?” 

बाबाला तो अपमान वाटला आणि रागही आला, “अर्थात, मला लिहिता येतं.”

तो कर्मचारी म्हणाला, “हे कुठलं अक्षर समजायचं?”

बाबा तोंडातल्या तोंडात म्हणाला, “तो ‘उ’ आहे.” 

“उ! कोण लिहितं असा उ?”

“मी”, बाबा पुटपुटला. 

“आपलं अक्षर स्वच्छ आणि सुंदर असलं असतं तर किती बरं झालं असतं. आणि शाईच्या डागांशिवाय आपल्याला लिहिता आलं असतं तर… तेव्हाच आपण पेन्सिल नीट पकडायला शिकलो असतो तर… तेव्हाच आपण आपलं अक्षर नीट घोटून घोटून वळणदार केलं असतं तर… पण आता खूप उशीर झालाय. आणि ही सगळी माझीच चूक आहे.”    

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश 

jonathan.preet@gmail.com

पालकनीतीच्या संपादकगटात सक्रिय सहभाग. आपल्या आयुष्याला नेमका हेतू नसतो हे जाणवून पर्यावरण, शिक्षण आणि लेखन या आवडत्या माध्यमांतले समोर येईल ते आणि आवडेल ते करून आनंदात राहण्याचा प्रयत्न करतात. 

सौजन्य : अरविंद गुप्ता टॉईज