विक्रांत पाटील
आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे, कधी आपल्या हावभावांमुळे, तर कधी एखाद्या कृतीमुळे समोरच्या माणसाचा अपमान होतो. विविध व्यक्ती कमी-अधिक प्रमाणात अपमानित होतात. हे आपल्या स्वतःच्या बाबतीतही घडतं! आपल्याही मनात कधीकधी समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे, कृतीमुळे, तिच्याकडून मिळालेल्या वागणुकीमुळे अपमानित झाल्याची भावना निर्माण होते. असं नेमकं कधी होतं? प्रत्येक वेळी अपमान समोरच्याच्या कृतीत / बोलण्यातच असतो का? की तो आपल्याच विचारांनी काढलेला निष्कर्ष असतो? नेमकं काय मिळालं की मला सन्मान मिळाल्याची जाणीव होते आणि काय हरवल्याच्या भीतीनं माझा अपमान होतो?
एकच वाक्य एका व्यक्तीला अस्वस्थ करतं, तर दुसऱ्याला त्यानं काहीच फरक पडत नाही. आपल्या मानापमानाच्या कल्पना आपल्या आत्मसन्मानाशी खूप जोडलेल्या असतात. समोरच्यानं भिरकावलेला अपमानाचा तुकडा मी माझा समजून झेलणार, की ‘माझा नाही’ असं ठामपणे म्हणून सोडून देणार हे मला स्वतःबद्दल काय आणि किती छान वाटतंय यावर अवलंबून असतं. मानसशास्त्रज्ञ जेनिफर क्रॉकर यांच्या मते प्रत्येकाचा आत्मसन्मान काही विशिष्ट ‘आधारस्तंभां’वर उभा असतो – कुणाचा बुद्धिमत्तेवर, कुणाचा दिसण्यावर, तर कुणाचा इतरांच्या मान्यतेवर.
ज्याचा आत्मसन्मान कर्तृत्वावर अवलंबून आहे, त्याला ‘तुला हे जमत नाही’ हे वाक्य खूप झोंबतं.
ज्याचा आत्मसन्मान इतरांच्या स्वीकृतीवर अवलंबून आहे, त्याला दुर्लक्षिलं जाणं किंवा वगळलं जाणं जास्त त्रासदायक वाटतं.
म्हणूनच अपमान समजून घेताना ‘काय बोललं गेलं’ इतकंच ‘कुणाच्या कोणत्या भावनिक आधारावर घाव बसला’ हे पाहणंही महत्त्वाचं ठरतं.
हे आत्मसन्मानाचे आधारस्तंभ कसे तयार होतात ते बघूयात. ज्या व्यक्तीला लहानपणी बुद्धिमत्तेवरून कौतुक आणि स्वीकार मिळालेला असतो, तिच्या आत्मसन्मानाचा आधारस्तंभ बुद्धिमत्ता नसतो. कुणी मूर्ख म्हणालं, तर तिला तो अपमान स्वतःवर न घेता सहज सोडून देता येतो.
उलट समजा एखाद्याला लहानपणी पालकांनी मूर्ख, बेअक्कल, बावळट अशा शिव्याशापांनी हिणवलेलं असेल. अशा वेळी त्या लहान बाळाकडे एकच मार्ग असतो – ‘माझे पालक म्हणताहेत त्याअर्थी मी मूर्खच असणार!’ असं खूप खोलपर्यंत मान्य करून टाकणं. पण पालकांच्या आणि समाजाच्या पसंतीस उतरण्यासाठी ‘आपण बुद्धिमान आहोत’ हे वरवर दाखवण्याचे आटोकाट प्रयत्न चालू असतात. ही व्यक्ती ‘मी बावळट आहे’ हे लपवण्यात खूप शक्ती खर्च करते. म्हणजे माझ्या आत्मसन्मानाचं लग्न बुद्धिमत्तेशी लावलं, की तो झाला आत्मसन्मानाचा आधारस्तंभ. पुढे प्रौढपणी समोरचा या व्यक्तीला ‘एवढं साधं कळत नाही, काय बावळट आहेस!’ असं म्हणाला, तरी ते खूप लागेल, अतिशय अपमानास्पद वाटेल. समोरची व्यक्ती जणू आपलं पितळ उघडं पाडतेय असं वाटेल.
‘शब्दांनी काय अंगाला छिद्र पडतात का?’ हे आपण अनेकदा कुणी तरी कुणाला तरी म्हटलेलं ऐकतो. पण अपमानाचे परिणाम शारीरिक दुखण्याइतकेच खरे आणि खोलवर असतात असं मानसशास्त्रीय संशोधन सांगतं. मेंदूतील ज्या भागात शारीरिक वेदना जाणवते, त्याच भागात – अँटीरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स – अपमानाच्या क्षणीही सक्रियता दिसते. म्हणजे ‘शब्द लागत नाहीत’ हे विधान वैज्ञानिकदृष्ट्या तितकंसं खरं नाही. म्हणजे एखाद्याचा अपमान करणं हे त्या व्यक्तीला शारीरिक मारहाण न करता इजा करण्यासारखं आहे.

काही पालकांच्या प्रेमाच्या कल्पना चुकीच्या असतात, कधी पालकांकडे मुलांना द्यायला वेळच नसतो, काही पालक मुलांकडे ‘कमी महत्त्वाचे’ म्हणून लक्ष देत नाहीत, काही मुलांना आई नसते, काहींना बाबा नसतो, तर काहींना आईबाबा दोन्ही नसतात. अशी, विविध कारणांनी दुर्लक्षित असलेली मुलं ‘आपण वाईट असणार म्हणून कमी महत्त्वाचे आहोत’ अशी समजूत मनात खोलवर रुजवून घेतात. मोठं झाल्यावरही हा न्यूनगंड त्यांच्या मनात दबा धरून राहतो. त्याच वेळी ‘आपण किती महत्त्वाचे आहोत’ हे दाखवण्याचा प्रयत्न वरवर चालू असतो. ते महत्त्व मिळवण्यासाठी विविध युक्त्या योजल्या जातात. लहानांना पाया पडायला लावणं इथपासून ते समारंभांमध्ये प्रतीकात्मक सत्कार व भेटी घेणं, तशी अपेक्षा ठेवणं, आणि हे मिळालं नाही तर अपमान वाटून घेणं (पुन्हा तेच, ‘मी वाईट असणार’ हे लपवायचा प्रयत्न करून तेच पितळ उघडं पडल्याची भीती).
आता उत्क्रांतिशास्त्राच्या अंगानं अपमान समजून घेऊयात. माझा अपमान होतोय म्हणजे माझं आत्मसन्मानाचं गणितच काहीतरी गंडलंय असं प्रत्येक वेळी समजू नये! उत्क्रांतिशास्त्रानुसार प्रत्येक भावनेचं काहीतरी प्रयोजन असतं. अपमान या भावनेलापण प्रयोजन आहे. शाब्दिक अपमान ही शारीरिक हल्ला करायच्या आधीची पायरी असू शकते. मला दुखवणं हाच समोरच्याचा हेतू असू शकतो. मग मला ते ओळखता येईल का? ‘समोरची व्यक्ती माझी शत्रू आहे आणि मला धोका पोहोचवू शकते’. सावध! म्हणूनच अपमान हा प्रत्यक्ष वेदनेसारखाच जाणवतो.
उत्क्रांतिशास्त्रानुसारच, अनेक संस्कृतींमध्ये अपमान हे प्रत्यक्ष मारामारी न करता वर्चस्व सिद्ध करण्यासाठी वापरतात. या जीवशास्त्रीय प्रेरणेतूनही काही मंडळींना इतरांना अपमानित करून आपण श्रेष्ठ असल्याचा आनंद मिळतो.
मानसशास्त्रात पूर्वी असं मानलं जायचं, की कमी आत्मसन्मान असलेली माणसं अपमानाला हिंसकपणे प्रतिसाद देतात. रॉय बॉमायस्टर आणि सहकाऱ्यांच्या संशोधनातून असं समोर आलं, की जास्त पण अस्थिर आत्मसन्मान असलेली माणसं – विशेषतः आत्ममग्न (नार्सिसिस्टिक) प्रवृत्तीची माणसं – अपमान झाल्यावर सर्वाधिक आक्रमक होतात. त्यांच्या स्वतःबद्दलच्या फुगलेल्या प्रतिमांना आव्हान मिळाल्यासारखं होतं, तेव्हा ती प्रतिमा दुरुस्त करण्याऐवजी ते समोरच्यावर हल्ला करून आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.
याउलट, स्थिर आत्मसन्मान असलेली माणसं – मग आत्मसन्मान जास्त असो वा मध्यम – अपमानाचा धक्का बऱ्यापैकी पचवू शकतात.
अपमान नेहमी थेट शिवीगाळीच्या रूपात येत नाहीत, तर दैनंदिन वागण्यातील सूक्ष्म असभ्यतेतून – म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा समाजात घडणाऱ्या काही संदिग्ध प्रसंगांतून – येतात. म्हणजे थेट अपमान नाही, पण समोरच्याला जाणते-अजाणतेपणी कमी लेखणं वगैरे.
ह्याची काही उदाहरणं पाहू :
- एखाद्याचं बोलणं मध्येच तोडणं आणि असं सतत होत राहणं.
- खालच्या स्वरात, तुच्छतेनं बोलणं – ‘हे तुला समजेल अशा सोप्या भाषेत सांगतो.’
- एखाद्याच्या कल्पनेकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणं आणि तीच कल्पना दुसऱ्यानं मांडली, की कौतुक करणं.
- कमी शिक्षित माणसाला तुच्छपणे अथवा कमी भावनेनं वागवणं.
अनेकदा अशा प्रसंगांचा हेतू जाणीवपूर्वक दुखावण्याचा नसतोही – समोरची व्यक्ती घाईत असते किंवा या वागण्याचे अमुक अमुक परिणाम होतील एवढा विचारही केलेला नसतो. पण संशोधन सांगतं, की परिणाम हेतूवर अवलंबून नसतो; समोरच्याला जे वाटतं, तेच खरं ठरतं. अशा प्रसंगांमुळे माणसाची कल्पकता, कामातली एकाग्रता आणि मदत करण्याची इच्छा घटते. आणि हा परिणाम फक्त अपमानित झालेल्या व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तो पाहणाऱ्यांपर्यंतही पसरतो. म्हणजे घरात एका व्यक्तीला वरील स्वरूपाची वागणूक मिळत असेल तर त्याचा परिणाम मुलांवरपण होतोच.
प्रत्येक माणूस एकंदर स्वतःच्या प्रतिष्ठेचं रक्षण करत असतो. त्यात एका कोणत्या गुणाला विशेष महत्त्व नसतं. म्हणजेच ‘एकूणात’ स्वप्रतिमेला कमीतकमी धक्का लागू देणं. अपमान पचवताना आपण स्वतःला आपल्या चांगल्या गुणांची / मूल्यांची आठवण करून दिली, तर अपमान पचवायला सोपा जातो.
अपमान ही केवळ शब्दांची देवाणघेवाण नाही; ती एक सामाजिक, मानसिक आणि जीवशास्त्रीय प्रक्रिया आहे. आपला आत्मसन्मान कशावर उभा आहे, तो किती स्थिर आहे आणि आपण त्या क्षणी किती असुरक्षित आहोत – या सगळ्यावर अपमानाची तीव्रता अवलंबून असते. हे समजून घेतलं, की अपमानाला सामोरं जाण्याचे स्वतःचे मार्ग आपण अधिक जाणीवपूर्वक निवडू शकतो आणि इतरांशी वागतानाही अधिक संवेदनशील राहू शकतो.
या सगळ्या विचारमंथनाचा पालकनीती म्हणून कसा बरं उपयोग होईल?
एक म्हणजे, ज्या घरात मूल असेल तिथे किमान वर उल्लेख केलेली सूक्ष्म असभ्य वागणूक टाळावी. मुलांना शिव्याशाप, दूषणं दॆऊच नयेत. अजाणतेपणी जरी मुलांना तुच्छ लेखलं गेलं असेल, तरीसुद्धा त्यांचा आत्मसन्मान कमी होतो. मुलांसमोर इतरांना असभ्य वागणूक दिली, तरीसुद्धा त्याचा त्यांच्या कल्पकतेवर, एकाग्रतेवर आणि भावनांकावर वाईट परिणाम होतो. दुसरं असं, की मुलांना ती आहेत तसा स्वीकार पालकांकडून मिळाला, तर त्यांचा आत्मसन्मान चुकीच्या कल्पनांच्या आधारस्तंभावर उभा राहणार नाही. एकदा मूल मोठं झालं, की बाहेरच्या जगात त्याला अपमानाच्या प्रसंगांना सामोरं जावंच लागणार आहे. पालक म्हणून आपल्या मुलांना तुम्ही जेवढं सहज प्रेम (नो कंडिशन्स अप्लाईड!) द्याल, तेवढी त्यांची स्वतःबद्दलची प्रतिमा चांगली असेल. मग इतरांनी सूचित केलेले अपमानस्पद इशारे ती स्वतःला लावून घेणार नाहीत.
पालकत्व म्हणजे मुलांना काय शिकवावं किंवा कशी वागणूक द्यावी एवढंच नसून तो एक स्वत:ला समजण्याचा प्रवास आहे. एखाद्या समुपदेशकाने जोपर्यंत स्वतःचे प्रश्न सोडवलेले नसतात, तोवर तो चांगला समुपदेशक होऊ शकत नाही. पालकांचा प्रवासही तसाच आहे. ज्या उणिवा, दुःख माझ्या पाल्याच्या वाटेला येऊ नयेत असं वाटत असेल, त्या सर्व बाबी मी आधी नीट समजून निस्तरण्याचं कौशल्य मिळवायला हवं.
विक्रांत पाटील

vikrant.patil@gmail.com
पालकनीतीच्या संपादक गटाचे सदस्य तसेच संगणकतज्ज्ञ. त्यांचा गणित, पर्यावरणस्नेही जीवनशैली, मानसशास्त्र अशा विविध विषयांचा अभ्यास आहे.
संदर्भ:
१. https://www.goodreads.com/book/show/29775868-mastering-civility
२. https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S1364661304001433
४. https://www.psychologytoday.com/us/blog/the-human-beast/201611/the-psychology-insults
