बाबा गाणं शिकतो तेव्हा…


अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश
लहान असताना बाबासाठी त्याचे आई-बाबा वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणायचे.
चेंडू. लोट्टो. नाईनपिन. खेळण्यातली चारचाकी. मग एक दिवस अचानक त्यांनी
पिआनो खरेदी केला. पण हे काही खेळणं नव्हतं. वरच्या बाजूनं काळा चकचकीत
असलेला हा पिआनो खूपच मस्त होता. मोठ्ठाच्या मोठ्ठा. एवढा, की त्यानं निम्मी
खोली व्यापून टाकली.
बाबानं आजोबांना विचारलं, ‘‘तुम्हाला पिआनो वाजवता येतो?’’
‘‘नाही,’’ आजोबा म्हणाले.
मग बाबानं आजीला विचारलं, ‘‘तुला पिआनो वाजवता येतो?’’
‘‘नाही,’’ आजी म्हणाली.
‘‘मग हा पिआनो वाजवणार कोण आहे?’’ छोट्या बाबानं विचारलं.
‘‘तू!’’ आजी-आजोबा एकमुखानं म्हणाले.
‘‘पण मलासुद्धा हा वाजवता येत नाही,’’ बाबा म्हणाला.
‘‘तुझा गाण्याचा वर्ग सुरू होणार आहे,’’ इति आजोबा. ‘‘आणि तुझ्या शिक्षकांचं नाव
आहे, नादेझ्दा फ्योदोरोव्ना,’’ लगेच आजीनं पुष्टी जोडली.
अचानक बाबाच्या लक्षात आलं, की त्याला एकदम भारीतली भेट मिळाली आहे.
यापूर्वी त्याची नवी खेळणी वापरायला तो त्याचा त्याचाच शिकला होता. त्यासाठी
घरी कोणी शिक्षक आला नव्हता. मग एक दिवस गाण्याची शिक्षिका आली. मृदू
आवाजात बोलणारी, जरा वयस्कशी बाई. बाबासाठी पिआनो वाजवायची. मग
हळूहळू ती बाबाला सूर शिकवू लागली. A, B, C, D, E, F, G. सात सूर!
बाबा ते पटकन शिकला. त्यानं मुळी सगळ्या सुरांची चित्रंच काढली; इंग्रजी लिपी
शिकण्याच्या वहीत काढली होती तशी. ‘A फॉर अ‍ॅप्पल’ म्हणत त्यानं सफरचंदाचं
चित्र काढलं. ‘B फॉर बॉय’ म्हणून मुलाचं चित्र. मग त्यानं एक मांजराचं चित्र
काढलं कारण ‘C फॉर कॅट’ असतं न! मग एक कुत्र्याचं चित्र, कारण ‘D फॉर डॉग’

असतं. ‘F फॉर फेन्स’ म्हणून कुंपणाचं आणि ‘G फॉर जिराफ’ म्हणून सातव्या
सुरासाठी जिराफाचं चित्र काढलं.
बाबा भलताच खूश होता. मात्र लवकरच त्याच्या लक्षात आलं, की पिआनो शिकणं
काही वाटतं तितकं सोपं नाही. परत परत तेच तेच वाजवून तो कंटाळून गेला.
ह्याच्यापेक्षा तर वाचण्यात, खेळण्यात आणि काहीच न करता बसून राहण्यात
जास्त मजा होती. दोन आठवड्यातच बाबा गाण्याच्या वर्गाला इतका वैतागला, की
पिआनोकडे बघणंही त्याला नकोसं झालं. सुरुवातीला बाबावर खूश असलेली नादेझ्दा
फ्योदोरोव्ना आता खिन्नपणे मान हलवू लागली.
‘‘तुला तुझा गाण्याचा वर्ग आवडत नाही का?’’ तिनं बाबाला विचारलं.
‘‘नाही,’’ बाबा म्हणाला. आपण असं म्हटलं, तर बाई आपल्यावर चिडून शिकवणं
थांबवतील, अशी त्याला प्रत्येक वेळी आशा वाटे. पण नाहीच.
आजी-आजोबा बाबाला चांगलेच रागवले.
‘‘एवढा भारीतला पिआनो आणला तुझ्यासाठी. शिकवायला बाई घरी येतात. तरीही
तुला शिकायचं नाहीए? लाज वाटायला हवी तुला.’’ ते म्हणाले.
आजोबा म्हणाले, ‘‘आज तुला पिआनो शिकायचा नाहीए. उद्या म्हणशील मला
शाळेत जायचं नाही. परवा म्हणशील मी काम करणार नाही. अशा आळशी पोरांना
लहान असतानाच शिकवायला हवं कसं काम करायचं ते. तुला पिआनो वाजवायला
शिकावंच लागेल.’’
आजी म्हणाली, ‘‘मी लहान असताना मला असा गाण्याचा वर्ग मिळाला असता तर
मला आकाश ठेंगणं झालं असतं. अगदी काय करू अन् काय नाही असं होऊन गेलं
असतं.’’
‘‘झालं बोलून. थँक्यू! पण तरीही मला गाणं शिकायचं नाहीए.’’ बाबा म्हणाला.
पुढच्या वेळेला नादेझ्दा फ्योदोरोव्ना घरी आली तेव्हा बाबा घरातून गायबच झाला.
आजी-आजोबांनी त्याला अख्ख्या घरात शोधलं, रस्त्यावर शोधलं; पण छे! तो
कुठ्ठेच सापडला नाही.
गाण्याच्या वर्गाची वेळ संपत आली तसा छोटा बाबा पलंगाखालून सरपटत बाहेर
आला आणि म्हणाला, ‘‘टाटा, नादेझ्दा फ्योदोरोव्नाताई.’’

आजोबा म्हणाले, ‘‘तुला तुझी चूक लवकरच लक्षात येईल.’’
‘‘तुमचं होऊ द्या, मग मीपण बघते त्याच्याकडे,’’ आजी म्हणाली.
बाबा म्हणाला, ‘‘तुम्हाला काय करायचं ते करा, मला त्याची फिकीर नाही. गाणं
तेवढं मी काहीही झालं तरी शिकणार नाही.’’ एवढं बोलून तो ढसाढसा रडू लागला.
कितीही झालं, तरी तो होता लहानच. आणि त्याला गाणं अजिबात आवडत नव्हतं.
त्याची गाण्याची ताई म्हणाली, ‘‘गाणं लोकांना आनंद देतं. माझा एकही विद्यार्थी
मी आले की असा लपून बसत नाही. अख्खा तास पलंगाखाली लपून बसणार्‍या
विद्यार्थ्याला नक्कीच गाणं शिकायचं नसणार. आणि तसं असेल, तर त्याला
जबरदस्ती शिकवण्यात काय हशील आहे? मोठं झाल्यावर कदाचित त्याला
पश्चात्ताप होईल. चला, मी येते. अशा विद्यार्थ्यांकडे जाते जे मी आले की लपून
पलंगाखाली जाऊन बसत नाहीत.’’
बाई गेल्या. आणि परत कधीच आल्या नाहीत. आजोबांनी बाबाला चांगलंच फैलावर
घेतलं. त्यांचं झाल्यावर आजीनंही हात साफ केला. पुढे बरेच दिवस पिआनोजवळून
जाताना बाबाचा चेहरा कसनुसा व्हायचा.
मोठं झाल्यावर बाबाच्या लक्षात आलं, की संगीतासाठी त्याचा कान तयारच झालेला
नाही. त्याला आजही एकसुद्धा गाणं नीट म्हणता येत नाही. तो पिआनो नीट
वाजवायला शिकला नसता, एवढं निश्चित.
कदाचित, सगळ्या मुलांनी पिआनो शिकलंच पाहिजे, असं नाही.

व्हेन डॅडी वॉज अ लिटिल बॉय
अलेक्झांडर रास्किन

अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश
opreetee@gmail.com

अनुवादक पूर्णवेळ आई असून लेखन, निसर्गस्नेही पालकत्व, बागकाम, शेती,
पर्यावरण, शिक्षण हे त्यांचे आवडीचे विषय आहेत