डॉ. कस्तुरी कुलकर्णी

रात्री झोपताना माझ्या लेकीनं, सा नं मला विचारलं, “आई तुला कशाची भीती वाटते?”

“कशाची अशी नाही. पण त्यातल्या त्यात वाईट माणसांची वाटते.” मी तिला म्हणाले. 

भीतीबद्दल बोलत असताना मला अनेक प्रसंग आठवले. 

एकदा सा आणि मी एका गडाच्या कड्यावर होतो. त्या कड्यावरून सोंडेकडे जात असताना अगदी निमुळता भाग आला. समोर कठीण आणि अतिशय तीव्र असा उतार दिसत होता. लांबून पाहताना ती वाट आव्हानात्मक वाटत होती. प्रत्यक्षात जवळ गेलो आणि उतरायला सुरुवात केली तेव्हा काळजी घेत ते जमलं. अर्थात, सहज नव्हतंच ते; पण वाटलं तितकं अवघडदेखील नव्हतं. परतीच्या वाटेवर चढ म्हणून ती जागा पुन्हा सामोरी आली. ती अवघड जागा कधी येणार असं आमचं बोलणं सुरू होतं, तेव्हा सा म्हणाली, “अग आई, ते दिसायला अवघड दिसतं, पण आपण चढायला लागलो की काही ते अवघड राहतच नाही.”  

काही गोष्टी अवघड असतात किंवा एकेका टप्प्यावर वाटू तरी शकतात तशा. पण खरं आहे सा म्हणते तसं; त्या अनुभवायला लागलो की त्यातला अवघडपणा, भीती आपोआप गळून पडते. कारण भीती अमूर्त असते… अनुभव जिवंत असतो…

ईबरोबर तिच्या (मेडिकल) कॉलेजमध्ये जायचं ह्या गोष्टीचं सा ला प्रचंड आकर्षण, कुतूहल आणि आनंद वाटत होता. सकाळी आल्याआल्याच लायब्ररी पाहून तिथली रंगीत मासिकं चाळून झाली होती.

मोकळ्या वर्गांमधल्या फळ्यांवर चित्रकाम करून झालं.

मधल्या चौकात लागवड केलेल्या औषधी वनस्पती पाहून ओळखून झाल्या.

कॉलेजमधले वेगवेगळे वर्ग, वेगवेगळ्या खोल्या, ग्रंथालय, व्यायामाची खोली… सारं काही आम्ही हिंडून पाहिलं.

दुपारची उशिराची वेळ होती.

आता सगळे वर्ग मोकळे होते. शिक्षक, मुलं… कुणीच नव्हतं. ऑफिसपण बंद झालेलं होतं. पूर्ण कॉलेज जवळजवळ मोकळं झालं होतं.

मी सा ला कॉलेज दाखवत होते.

पहिल्या मजल्यावरच्या एका वर्गातून आम्ही बाहेर पडलो.

शेजारीच शरीरशास्त्र विभाग (anatomy department) होता. तिथे कुणी नव्हतं.

पाच वर्षांची सा सहज आत शिरली; पाठोपाठ मी आणि आमच्या एमडी कोर्समधली एक ज्युनियर डॉक्टरदेखील.

तिथे समोरच मानवी सापळा लटकवलेला होता.

सा धावत त्याच्याजवळ गेली आणि तिनं त्याचा हात हातात घेतला.

बोटांवर असलेली पेरं आणि सापळ्यामध्ये असणारी हाडं कशी एकमेकांसारखी आहेत ते तिनं पाहिलं.

एक न् एक मणका हातात घेतला.

कवटी, डोळ्याची खोबणी, जबडा, दातांची जागा… सगळं जवळून निरखून पाहिलं.

शरीरात कोणतं हाड कुठे असतं ते हाताळून नीटच समजून घेतलं.

पाठीचं त्रिकोणी हाड अंगावर कुठे असतं ते ज्युनिअर डॉक्टरच्या पाठीला हात लावूनदेखील बघितलं.

कानातली आतली अगदी पिटुकली हाडं आणि मांडीचं भलं मोठ्ठं, दांडुक्यासारखं हाड हातात धरून बघितलं.

हाडं आणि सापळ्याची ओळख-परेड झाली, तशी सा आणखी आतल्या भागात गेली.

आम्ही दोघी बोलत तिथेच उभ्या होतो.

‘आई हे काय आहे?’ या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी पाहिलं, तर सा चा हात एक्झामिनेशन टेबलवरच्या काळ्याकुट्ट ममी (mummy) च्या खपाटीला गेलेल्या पोटावर होता.

त्या शेजारी आणखी एक टेबल होतं. तिथे डिसेक्शन अपूर्ण राहिलेलं एक शरीर होतं.

“बापरे, मॅडम…” एवढेच शब्द त्या ज्युनिअर डॉक्टरच्या तोंडून आले.

सा च्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मी तिला ताबडतोब हात धुवायला नेलं.

“आई का ग? हात का धुवायचे?”

“तो मेलेला माणूस आहे.”

“हो? खरंच? मेलेला माणूस असा दिसतो??”

“मेल्यावर खूप दिवसांनी असा दिसतो.”

“मग तो इथे का ठेवला आहे?”

“त्याच्या शरीराचा, आतल्या अवयवांचा अभ्यास करण्यासाठी.”

बेसिनपाशी जाता जाता आम्ही बोलत होतो.  

सामान्यपणे एखाद्या लहान मुलीला भीती वाटेल असा प्रसंग होता, पण सा ची गंमतच आहे. 

ती साडेतीन वर्षांची असतानाची गोष्ट. आम्ही संध्याकाळी शेजारच्या बागेत गेलो होतो. अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. अंधार पडला होता. आडोशाला न थांबता सा पावसात भिजायला गेली. तिला पाहून आणखी एक-दोन मुलं तिच्या मागोमाग पावसात बागडायला गेली. मी त्यांच्या मागे गेले नव्हते. लांबून त्यांची गंमत पाहत होते.

दोन मिनिटांनी ती मुलं धावत परत आली.

“काकू, तिनं बेडूक हातात घेतला आहे!”

मी विचारलं, “तुम्ही पाहिलात का मग?”

त्यांना हा प्रश्नच अनपेक्षित होता. ती गोंधळली. 

त्यातला एक जण म्हणाला, “ईsss… नाही!”

तिकडे सा बेडकाला हात लावून पाहत होती. त्याच्या मागोमाग त्याच्यासारख्याच उड्या मारत पावसात भिजत होती.

पावसात, चिखलात, अंधारात… तिला त्याची भीती वाटली नव्हती; उलट तिच्यातलं कुतूहल ओसंडून वाहत होतं.

कधीकधी एखाद्या गोष्टीची भीती आपल्याला प्रत्यक्ष त्या गोष्टीमुळे कमी आणि तिच्याबद्दल आधीपासून मनात असलेल्या कल्पनांमुळे जास्त वाटते. कुतूहल प्रचंड प्रमाणात जागं झालं की भीतीला पुढे जायला फारसा वाव मिळत नाही. सा ला आम्ही कधी कशाची भीती दाखवत नाही. 

माझ्या एका मैत्रिणीच्या ओळखीत कुणी एका आजीबाईनी अकारणच मैत्रिणीच्या पाच वर्षांच्या मुलाला ‘सध्या लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी आसपास फिरत असते’ अशी माहिती दिली. तेव्हापासून पुढचे कितीतरी दिवस आईचा हात धरल्याशिवाय तो ग्राऊंडवरही मोकळेपणानं जाईना. 

मुलांना कोणत्या संदर्भात, कोणत्या ठिकाणी, कोणत्या वेळी, काय, किती आणि कसं सांगावं याचं स्थळ-काळ-औचित्य भान माणसांना का येत नसेल बरं? असं काही सांगताना जेमतेम एखादा मिनिटसुद्धा पुरून उरेल बोलायला; पण ते बोलणं पुढे त्याच्या भावविश्वात किती काळ रेंगाळणार आहे आणि त्याचे किती परिणाम होणार आहेत, सौम्य की गंभीर, याचा विचार असायला नको का?

“तिथे जाऊ नकोस बरं का. बोकाडी येईल.”

“हा भात संपवला नाही, तर वॉचमनकाका रागावतील हं.”

“तिकडे पळायचं नाही. पोलीस पकडून नेतात बरं का.”

“ते काका रागावतील बरं.”

“ही डॉक्टरमावशी इंजेक्शन देईल बरं का आता!” 

दुकानात गेल्यावर छोटं मूल स्वाभाविकपणे वस्तू हाताळू लागतं. तेव्हा त्यानं हात लावू नये म्हणून ‘काका रागावतील हं!’ म्हणून सांगितलं जातं. किंवा आपल्या सोयीसाठी आपण त्याला फोन, टीव्ही दाखवतो. काही वेळानं त्यानं ते बघणं पुरे करावं असं आपल्याला वाटतं. मात्र त्यानं ते लगेच ऐकलं नाही की ‘पोलिसांची गाडी येईल. चला लवकर. ठेवा…’ असले धाक कशासाठी?

कुणाही अनोळखी, काल्पनिक पात्रांच्या नावे असली बिलं फाडणं कशासाठी? भूत, चेटकी, बोकाडी असल्या – ज्यांच्या अस्तित्वाचीदेखील विज्ञानानं दखल घेतलेली नाही – काल्पनिक पात्रांची मुलांना आवर्जून ओळख करून देऊन त्यांच्या नावावर काहीही कशासाठी खपवायचं?

मी आणि सा बरेचदा टेकडीवर जातो. सा च्या अंगाखांद्यावर तिथल्या शेळ्या खेळतात, तिचं अंग चाटून तिला माया करतात. तीही त्यांचे लाड करते. शेळ्यांबरोबर त्या शेळ्या पाळणाऱ्या कुटुंबाशीही आमची चांगली मैत्री आहे. तिथे सा ची एक मैत्रीण आहे प्राजक्ता. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आम्ही टेकडीवर गेलो होतो. तिथे जरा लांब एका बाजूला पळसाचं झाड आहे. ते सा ला पाहायचं होतं. तिथपर्यंत जाऊन येताना ती थकली. मार्चचं कडक ऊन होतं. येताना शेळ्यांपाशी थांबलो. प्राजक्ताकडे तोवर गुढी उभारली होती. तिच्या आईनं आम्हाला ‘ब्येव’ प्यायला दिलं. बोलता बोलता त्या म्हणाल्या, टेकडीवर इतकी लहान-मोठी माणसं येतात, पण शेळ्यांना फार घाबरतात. 

काही वेळा भीती ही अंतरातून आणि अपरिचयातून निर्माण होते. मुलांना आपण भोवतालच्या परिसराशी, माणसांशी, निसर्गाशी निर्भयपणे ओळख करून द्यायला हवी. त्याबरोबरच त्यांच्यातलं कुतूहल जागं ठेवणं, त्यांना योग्य ती माहिती देणं आणि योग्य ती काळजी घेणं आवश्यक असतं. यातून पुढे विवेकी मन घडणार असतं. 

मी कॉलेजमध्ये असताना भीतीबद्दल वाचलं होतं, की एखाद्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत असली, तर ‘समजा तसं घडलंच तर काय होईल? वाईटात वाईट काय होईल?’, अशी कल्पना करावी. 

कल्पना करून पाहणं हे ठीकच, पण काही भीती अनुभव घेऊनच जातात. जसं पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, तसंच अनुभवल्याखेरीज भीती कमी होत नाही.      

कल्पना आणि वास्तव यातलं अंतर जितकं जास्त, तितकी भीती जास्त असते.

दोन दिवसांपूर्वीची गोष्ट.   

पाऊस पडून गेला होता. रात्री पंखवाल्या मुंग्या, रातकिडे, भुंगे घरात आले….

सा ने तिचं भिंग घेऊन त्यांचं जवळून निरीक्षण केलं. त्यांचे पाय, मिश्या, पंख हे तर तिनं पाहिलेच; पण त्यांना नांगी / डंख आहे का, हेही ती तपासत होती. तिचं निरीक्षण झाल्यावर मी तिला रातकिड्यांवरचा एक व्हिडिओ दाखवून त्यांच्याविषयी अधिक माहिती सांगितली.

थोड्या वेळानं रात्रीचं जेवण करायला नेहमीप्रमाणे आम्ही बाल्कनीत बसलो. तिथे एक रातकिडा आसपास उड्या मारत होता. तो जेवणात, ताटात पडू नये म्हणून सा चे संजूआबा काळजी घेत होते. रातकिड्याला घाबरतो आहे असं सा ला भासवत होते.

तेव्हा सा म्हणाली, “आबा, त्याला काय घाबरता! तो अजिबात चावत नाही. त्याच्याकडे डंख किंवा नांगीसुद्धा नाही. तुम्हाला उगाच भीती वाटते. तो आपल्याला काहीसुद्धा त्रास देत नाही.”

मुलांच्या ठायी असलेल्या नैसर्गिक कुतूहलातून झालेले निरीक्षण, त्यातून मिळालेली माहिती आणि माहितीतून आलेली समज… मग भीतीला फारशी जागाच राहत नाही.

 ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव हे दोन्ही भीती घालवण्याचे सर्वोत्तम मार्ग आहेत. 

अनेकदा पालक म्हणतात, ‘तिथे जाऊ नकोस, पडशील!’… आता मूल कधीतरी पडणारच आहे. त्याला आपण त्यातून सावरायला, स्वतःला जपून वावरायला, स्वतःची आणि दुसऱ्याचीही योग्य काळजी घ्यायला शिकवणार आहोत, की लागेल म्हणून सोडणारच नाही आहोत?

एका पेशंटनं सांगितल्याचं आठवतंय, की तो लहान असताना नदीच्या पाण्यात खेळत असताना त्याच्या नात्यातल्या कुणी अचानक त्याचं डोकं पाण्यात घातलं. त्याला गुदमरायला झालं. तेव्हापासून त्याची पाण्याची भीती, आता पन्नाशी उलटली तरी, गेलेली नाही. 

पेशंटचं मनोविश्व समजून घेण्यासाठी सविस्तर केस घेताना भीतीचे कितीतरी उगम आढळून येतात.

माणसं मोठी झाली, आई / बाप / आजी / आजोबा झाली, आपापल्या क्षेत्रात पुढे गेली, तरी असे काही खोलवर रुतलेले भीतीदायक अनुभव, समजा पुसल्या जात नाहीत. 

आपली जशी एक ‘फॅमिली हिस्ट्री’ असते, तसा प्रत्येकाचा एक भावकोशही असतो. त्यातल्या कित्येक अनावश्यक गोष्टी, आपल्या नकळत, आपण पालक म्हणून मुलाला देत असतो. नाना प्रकारचं भय हा त्यातलाच भाग. आपल्याला वाटत असलेली भीती असते ती. आपण त्यावर पूर्ण मात करू शकू असं नाही; पण किमान आपल्याला त्या चौकटीची जाणीव असायला हवी. मुलाला त्याच्या अवकाशात कोरी पाटी घेऊन जाण्याचं, पालकांचे पूर्वग्रह मध्ये न आणता विहरण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं. 

सॉक्रेटिस राजाला म्हणाला तसं – तू काही देऊ नकोस. फक्त माझ्यावर येणारा सूर्यप्रकाश अडवू नकोस. तुझी सावली दूर कर. 

डॉ. कस्तुरी कुलकर्णी

dr.kasturi1004@gmail,com

होमिओपॅथिक डॉक्टर, समुपदेशक, शिक्षक, योग तसेच संगीत अभ्यासक. जगजीवनातल्या सगळ्या गोष्टींबद्दल जिज्ञासा असलेली आजन्म विद्यार्थिनी.