बाबा शाळेत जाऊ लागला तेव्हा…
अलेक्झांडर रास्किन
अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश
लहानपणी बाबा सारखाच आजारी पडायचा. त्याला झाला नसेल असा एकही बालरोग नव्हता. त्याला गोवर झाला होता, गालगुंड झालं होतं, आणि डांग्या खोकलाही झाला होता. प्रत्येक आजारानंतर त्यात काहीतरी गुंतागुंत व्हायचीच. आणि बरं होताहोताच छोटा बाबा पुन्हा आजारी पडायला तयार असायचा.
आता शाळेत प्रवेश घेण्याची आणि शाळा सुरू होण्याची वेळ आली, तरी बाबा आपला नेहमीप्रमाणे आजारीच होता. एकदाचा बरा होऊन पहिल्यांदाच शाळेत गेल्यावर त्याच्या लक्षात आलं, की त्याचे सगळे वर्गमित्र बऱ्याच दिवसांपासून अभ्यासाला लागलेले होते. त्यांच्या एकमेकांशी ओळखी झालेल्या होत्या, आणि वर्गशिक्षिकाही प्रत्येकाला नावानिशी ओळखत होती. पण छोट्या बाबाला मात्र कोणीच ओळखत नव्हतं. सगळे त्याच्याकडे टक लावून बघत होते. त्याला कसंसंच झालं; खास करून काही मुलांनी त्याला वेडावून दाखवलं तेव्हा. एका मुलानं तर त्याला मुद्दाम पाय घालून पाडलं. छोटा बाबा धडपडलाच. पण तो तरीही रडला नाही. तो लगेच उठला आणि त्यानं त्या मुलाला ढकललं. मग काय! तो मुलगा पडला. तो मुलगाही लागलीच उठला आणि त्यानं छोट्या बाबाला ढकललं. मग छोटा बाबा पुन्हा पडला. पण यावेळीही तो रडला नाही. त्यानं पुन्हा त्या मुलाला ढकललं. असं ते एकमेकांना दिवसभरही ढकलत राहिले असते, पण तेवढ्यात घंटा वाजली. मुलं रांगेत वर्गात आली आणि आपापल्या जागी बसली. आपण कुठे बसायचं ते छोट्या बाबाला कळत नव्हतं. वर्गाशिक्षिकेनं त्याला एका मुलीच्या शेजारी बसायला सांगितलं. सगळी मुलं हसू लागली. जिच्या शेजारी तो जाऊन बसला, ती मुलगीही हसत होती. छोट्या बाबाला रडावंसं वाटत होतं. पण अचानक त्याला सगळं खूप मजेशीर वाटलं, आणि तो हसलाच. मग वर्गशिक्षिकाही हसली.
“छान केलंस. मला वाटलं आता तू रडायला लागशील”, ती म्हणाली.
“मलाही तसंच वाटलं होतं”, छोटा बाबा म्हणाला. यावर सगळे पुन्हा हसले.
“मुलांनो!” वर्गशिक्षिका म्हणाली, “तुम्हाला जेव्हा जेव्हा रडावंसं वाटेल, तेव्हा हसण्याचा प्रयत्न करा. हा सल्ला तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल. चला, आता आपण धड्याकडे वळूया.”
त्या पहिल्याच दिवशी बाबाला शोध लागला, की तो त्याच्या वर्गातल्या सगळ्या मुलांपेक्षा चांगलं वाचू शकत होता. आणि त्याच्या हेही लक्षात आलं, की त्याचं हस्ताक्षर सगळ्यांपेक्षा वाईट होतं. मात्र सगळ्यांना जेव्हा कळलं, की बाई शिकवत असतानादेखील हा सतत बोलण्यातच पुढे असतो, तेव्हा बाईंनी बोटानंच त्याला शांत राहण्याचा इशारा केला.
त्यांची शिक्षिका चांगली होती. थोडीशी कडक होती, पण मायाळूही होती. तिच्या शिकवण्यात मजा असायची. छोट्या बाबाला तिचा सल्ला आयुष्यभर लक्षात राहिला. तो त्याचा शाळेचा पहिलाच दिवस होता ना! त्यानंतर असे अनेक विशेष दिवस आले आणि गेले. शाळेत असताना छोट्या बाबाच्या बाबतीत अनेक मजेशीर, दुःखद, चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या. पण ते परत केव्हा तरी!
अनुवाद : प्रीती पुष्पा-प्रकाश

पालकनीतीच्या संपादकगटात सक्रिय सहभाग. आपल्या आयुष्याला नेमका हेतू नसतो हे जाणवून पर्यावरण, शिक्षण आणि लेखन या आवडत्या माध्यमांतले समोर येईल ते आणि आवडेल ते करून आनंदात राहण्याचा प्रयत्न करतात.
सौजन्य : अरविंद गुप्ता टॉईज
